Jayakwadi Dam Paithan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Politics : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा होण्याची चिन्हे, विखेंसह उत्तरेतील नेते आमने-सामने!

Ahmednagar Water Issue Radhakrishna Vikhe Patil : जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात नगर जिल्ह्यातील नेते आक्रमक झाले आहेत. आता हे नेते आमने-सामने येणार आहेत...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Politics : भंडारदरा (प्रवरा कालवे) रब्बी हंगामासाठी पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाकडून नगरमध्ये बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी-अभियंते यांच्यासह उत्तरेतील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांना बोलावण्यात आले आहे. पालकमंत्री विखेंच्या समोर उत्तरेतील नेते आमने-सामने येणार असून, एकमेकांवर तोफा धडाडणार अशीच परस्थिती जिल्ह्यातील पाट-पाण्याच्या समस्येवरून असणार आहे.

येत्या 16 नोव्हेंबर रोजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजता भंडारदरा (प्रवरा कालवा) रब्बी हंगाम 2023-24 साठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा विभागाने आयोजित केली आहे. ही बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

बैठकीस नाशिक विभागीय आयुक्त, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हा फळबाग संघाचे अध्यक्ष, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, अगस्ती सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, पदमश्री डॉ. विठठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरा नगर, डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना, अशोक सहकारी साखर कारखाना यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सध्या नगर-नाशिक धरण समूहातील 8 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याच्या जलसंपदाच्या आदेशामुळे एकीकडे नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटलेला आहे. पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील नेते आक्रमक झाले असून हा लढा न्यायालयात पोहचला आहे. अशात जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाण्यासाठी नगर जिल्ह्यात विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यातील नेते एकमेकांवर आगपाखड करत आरोप-प्रत्यारोप करत आहे.

नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी मुळा ऐवजी निळवंडे धरणातून दोन टीएमसी पाणी सोडावे अशी मागणी केली आहे, तर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही श्रीरामपूर तालुक्यासाठी पाण्याचा आग्रह जोरदार लावून धरला आहे. मुरकुटे यांनी तर जायकवाडी पाणी प्रश्नावरून आणि ऊस पळवापळवीवरून बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांना धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर 16 तारखेला उत्तरेतील साखर कारखानदार नेते कालवा सल्लागार समिती बैठकीच्या निमित्ताने आमने-सामने येणार असून पेटलेल्या पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांवर तोफा डागणार अशीच परस्थिती दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात झालेला अत्यल्प पाऊस, बहुतांशी तालुक्यातील दुष्काळसदृश परस्थिती, जायकवाडीला समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार द्यावे लागणारे पाणी यामुळे यंदा याचा एकत्रित परिणाम ऊस लागवडीवर होणार आहे. त्यामुळे यंदाच कारखान्यांना गाळपासाठी ऊसाचा तुरवडा जाणवणार आहे. तर पुढील वर्षी ऊसाच्या अभावी गाळपाचाच प्रश्न अनेक कारखान्यांना भेडसावणार आहे. त्यामुळे एकूणच कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT