Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Marathwada Water Crisis : जायकवाडीवरून नगरच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या आमदार बंब यांना विखेंच्या कानपिचक्या!

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Water Issues : जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीमध्‍ये झालेला ठराव सर्वपक्षीय आमदारांनी मिळून केलेला आहे. यामध्‍ये मराठवाड्याला पाणी देण्‍यासंदर्भात कुठलीही टोकाची भूमिका नाही. या प्रश्‍नाकडे राजकीय भूमिकेतून आणि कायद्याकडे बोट दाखवून निर्णय करण्‍यापेक्षा संकटातून कसा मार्ग निघेल याचा सर्वकंश विचार करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे मत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. मराठवाड्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत जायकवाडीला पाणी सोडण्याबविरोधात मंजूर केलेला ठराव दुर्दैवी असल्याची टीका केली होती.

आमदार प्रशांत बंब यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगर जिल्ह्यातील नियोजन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी देण्याविरोधात ठराव केला. हा राज्याच्या मंत्र्यांच्या उपस्थित संमत होणे म्हणजे मराठवाड्याचे दुर्दैव आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न आमदार बंब यांनी उपस्थित केला आहे.

आमदार बंब यांच्या वक्‍तव्‍यावर आपली प्रतिक्रीया देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्‍हणाले की, जायकवाडी धरणातील पाण्‍याचा साठा पाहिला तर आज पिण्‍यासाठी पुरेसे पाणी उपलब्‍ध आहे. उलट नगर जिल्‍ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. पाऊसच यंदा झाला नसल्‍याने पाण्‍याची गरज नगर जिल्‍ह्यालाही मोठी आहे. त्‍यामुळेच मराठवाड्यातील नेत्‍यांनी सुद्धा समन्‍वयाची भूमिका दाखवावी हाच आमचा उद्देश आहे. त्‍यांच्या आधिकारावर आम्‍ही अतिक्रमण करतोय ही भूमिका आमची कधीच नसल्‍याचे विखे यांनी स्‍पष्‍ट केले.

या प्रश्‍ना संदर्भात आमदार प्रशांत बंब यांच्‍याशी मी व्यक्‍तिगत बोलणार आहे. पाण्‍याच्‍या समस्‍येवर राजकीय भाष्‍य किंवा कायद्याकडे बोट दाखवून हा प्रश्‍न सुटणार नाही. या संकटातून मार्ग कसा काढायचा यासाठी सर्वंकश विचार करण्‍याची आज आवश्‍यकता असल्‍याचे सांगून आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍ये बाबत केलेले विधानही अत्‍यंत चुकीचे आहे. आत्‍महत्‍येला कोणीही प्रवृत्‍त करीत नसतो. आज वरच्‍या भागातही पाणी नाही. येथील शेतकरी हालाखीच्‍या परिस्थितीत आहे याचाही विचार करणे आवश्‍यक असल्‍याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्‍हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT