Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्याला अनुसरून, जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी देण्यास विरोध करणाऱ्या तीन याचिका दाखल असतानाच, आता विखे यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याने सुद्धा जायकवाडीस पाणी देण्याच्या विरोधात आपली याचिका दाखल केली आहे.
विखे कारखान्याच्या याचिकेचा मूळ याचिकेत समावेश व्हावा अशी विनंती उच्च न्यायालयात करण्यात आली होती. याचिकेच्या मागणीवर पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक व नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात ८.६० टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील मूळ याचिकेत अंतरीम अर्ज दाखल करुन, आव्हान दिले आहे. त्याची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समुहातून सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय पाहता, तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी प्रामुख्याने याचिकेच्या माध्यमातून कारखान्याच्या वतीने करण्यात आली असल्याचे डॉ.भास्करराव खर्डे यांनी सांगितले. कारखान्याच्या वतीने अॅड.नायडू तसेच अॅड.संजय खर्डे यांनी न्यायालयात बाजू मांडली .
उर्ध्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. केवळ मागील वर्षाचा पाणीसाठा शिल्लक राहील्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणाच्या लाभक्षेत्रात यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. झालेला पाऊसही समप्रमाणात नसल्याने, तसेच खंडीत असल्याने भूजल पातळी खाली गेलेली आहे.
पावसाळा हंगामात विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे खरीप हंगामातही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टंचाईला प्रवरा धरण समुहातील लाभधारक शेतक-यांना सामोरे जावे लागले ही बाब डॉ. विखे पाटील कारखान्याने याचिकेत प्रामुख्याने मांडली आहे.
केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने तसेच अवमान याचिका होईल या भितीपोटी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यापेक्षा, उपलब्ध पाणी साठ्याचा कार्यक्षम वापर करुन १ टीएमसी पाण्यात उर्ध्व भागात किती सिंचन केले जाते व जायकवाडी धरणात १ टीएमसी पाण्यामध्ये किती क्षेत्र सिंचीत होते याबाबतही तुलनात्मक विचार करण्याची गरज याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. जायकवाडी जलाशयातून केला जाणारा अनियंत्रित उपसा व कालव्यांमधून होणारी गळती या गंभीर बाबीकडे या याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
जायकवाडी धरणात २६ टीएमसी मृत पाणीसाठा उपलब्ध असल्याने यासाठ्यातून अपवादात्मक परिस्थितीत जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पाण्याची उपलब्धता होवू शकते, ही बाब निदर्शनास आणण्यात आलेली आहे. यापुर्वी असा वापर झालेला असल्याने याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कोणत्याही अटी व शर्तींचे पालन अद्याप केले नाही. परंतु फक्त पाणी सोडण्याची कार्यवाही मात्र न चुकता केली जाते. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतक-यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, अशी भावना लाभधारकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाचा आग्रह धरुन, पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाचा देण्यात आलेल्या आदेशाबाबत गांभिर्याने विचार करण्याची विनंती याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.