Jalgaon Mahayuti Controversy: जळगाव विधान परिषदेची जागा भाजप पक्षाला सुटल्याची चर्चा शनिवारी होती. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना झाले होते. ते उपमुख्यमंत्री आणि पक्ष नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महत्त्वाचा निर्णय घेण्याचा वावड्या उठल्या होत्या.
जळगाव मतदारसंघ मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी मंत्री पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे भाजप प्रवेश करतील अशा बातम्या पसरल्या होत्या. मंत्री पाटील यांच्या जळगाव येथील निकटवर्तीयांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
शिवसेना पक्षात फूट पडल्यावर मंत्री पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातून बाहेर पडले होते. गेली 45 वर्ष ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी आपली प्रस्थापित राजकीय कारकीर्द ते पणाला लावण्याचा बातम्यांनी जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन मतदारसंघ सोडण्याची शक्यता देखील कमीच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जळगावच्या जागेवरून निर्माण झालेला महायुतीतील वाद पेल्यातील वादळ ठरण्याची चिन्हे आहेत.
जळगाव जिल्ह्यात महायुतीचा घटक म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष तुल्यबळ असल्याचा दावा सातत्याने करण्यात आला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी या संदर्भात एकजूट असल्याचे स्पष्ट केले होते. या आमदारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जळगाव मतदार संघासाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याची मागणी केली होती.
मतदारसंघ भाजपने न सोडल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील होता. या पार्श्वभूमीवर रोज नव्या राजकीय चर्चा सुरू आहेत. आज विधान परिषद जागावाटपाच्या निर्णयाने त्यावर पडदा पडेल, असा दावा शिवसेना शिंदे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.