MLA Kashiram Pawara Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Kashiram Pawara Attack News: काशीराम पावरांवर जमावाचा हल्ला: पुर्वनियोजित कटाचा संशय

Shirpur News : सांगवी (ता. शिरपूर) परिसरात गुरुवारी सायंकाळी बॅनर फाडण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

सरकारनामा ब्यूरो

Shirpur News : "दैवाची कृपा आणि जनआशीर्वादामुळेच गुरुवारच्या प्रसंगातून बचावलो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. नियोजनबद्ध रीतीने हल्ला झाला...पण माझे दैव बलवत्तर होते म्हणून मी सुखरूप आहे... ही प्रतिक्रिया आहे, शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा यांची..!

सांगवी (ता. शिरपूर) परिसरात गुरुवारी सायंकाळी बॅनर फाडण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. या हाणामारीचे दंगलीत रुपांतर झाले. हिंसक जमावाने रास्ता रोको केला. शांततेचे आवाहन करण्यासाठी आमदार पावरा तिथे गेले. पण जामावाने पावरा यांच्या वाहनावर हल्ला केला.

सांगवीत नेमके काय घडले?

सांगवीत दुपारी चारपासून ही दंगल उसळली. जमावाने महामार्गावर रास्ता रोको सुरू केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी तुम्ही आलात तर उपयोग होईल, अशी विनंती स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. जमावाला शांत करण्यासाठी आमदार पावरा घटनास्थळी पोचले. ग्रामपंचायतीजवळ त्यांना जमावाने गराडा घातला. पण बॅनर फाडणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्यायला सांगा, अशी मागणी काहींनी केली. (Shirpur News)

पण कायद्यानुसार तसे करता येणार नाही, आपण संशयितांविरोधात गुन्हे दाख करण्यास पोलिसांना सूचना देऊ, अस पावरा यांनी जमावाला सांगितलं. पण संतप्त जमाव ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पावरा पोलिसांसह महामार्गावर असलेल्या जमावाकडे जाण्यासाठी निघाले. तितक्यात त्यांच्यावर तुफान दगडफेक सुरू झाली.

पावरा यांच्या गाडीची तोडफोड

जमाव इतका हिंसक होता त्यांनी पावरा यांच्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करून ती गाडी उलटवून लावली. इतकेच नव्हे तर वाहनाचे वायरलूम आणि इतर पार्टही तोडण्यात आले. चाकातील हवा सोडण्यात आली.

कुंपणावरून घेतली उडी

दगडफेकीपासून बचावासाठी पावरा रस्त्याकडेच्या टपरीमागे गेले. पोलिसांनी आमदारांना पुढे जाऊ नका, मागच्या मागे निघून जा, असा सल्ला दिला. टपरीमागे काटेरी कुंपण होते. त्यावरून उडी घेत पावरा पलीकडे गेले. त्या वेळी अंधारात त्यांचा मोबाईल, खिशातील विधानसभेचे ओळखपत्रही चिखलात पडले. नाल्याकडेने जात काही अंतरावर एका घरात आमदार पावरा यांनी आश्रय घेतला. ते कोणाच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून मालकाने घरातील सर्व लाइट्स बंद केले.

अखेर पोलिसांनी सोडले घरी

काही वेळाने कानोसा घेतल्यानंतर पावरा यांनी जिल्हा परिषद सदस्य योगेश बांदल यांना संपर्क साधला. पावरा हे ज्या घरात थांबले होते तिथून त्यांना स्वत:च्या घरी नेले. तसे त्यांनी पोलिसांना सांगितले. पुढे पोलिसांनी वाहनातून आमदारांना सुळे (ता. शिरपूर) येथील निवासस्थानी सोडले आणि या थरार नाट्यावर पडदा पडला.

जमावाने असे का केले, ते अनाकलनीय आहे. पण ज्या पद्धतीने ते घडले, त्यावरून तो नियोजनबद्ध कट असल्याची शंका येते. काही विकृत प्रवृत्ती या समाज सतत अस्वस्थ असावा, अशा प्रयत्नात असतात. त्यांच्या मागे युवकांनी लागू नये. शांततेच्या मार्गाने खरा विकास होतो. हिंसा, तोडफोड करू नका, स्वत:चे आयुष्य कोर्ट-केसेसमध्ये बरबाद करू नका. शांतता ठेवा, कुटुंबाची प्रगती साधा, असे आवाहन काशीराम पावरा यांनी केलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT