Nashik Farmer, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : 'आधी कंगाल केले अन् आता मते मागता'; शेतकऱ्याने भाजपची लाजच काढली

Nashik Farmer and BJP : भाजप प्रचारकाला शेतकऱ्याने सडेतोड उत्तर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

संपत देवगिरे, नाशिक

Nashik Political News : 'तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः नागवले आहे. कर्जबाजारी केले आहे. आता कोणत्या तोंडाने आमच्याकडून मतांची अपेक्षा करता? शेतकरी तुम्हाला कधीच मतदान करणार नाही', अशा कडक शब्दात भाजपच्या प्रचारकाला शेतकऱ्याने झापले.

नाशिक हा कांदा आणि द्राक्ष उत्पादकांचा जिल्हा आहे. भाजपच्या केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने सर्वाधिक झळ येथील शेतकऱ्यांना बसली. त्यातून दिलासा मिळेल, ही प्रतीक्षा करतानाच निर्यात बंदीने द्राक्षांच्या पिकाचीही दुर्दैवी स्थिती केली. त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड संतप्त आहे. याचा फटका आता भाजपला बसू लागल्याचे दिसून येत आहे. त्याचा अनुभव आता एका भाजप प्रचारकाला आला आहे.

भाजप सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीत व्यस्त आहे. त्यासाठी पक्षाने विविध प्रकारे प्रचार सुरू केला आहे. अनेक यंत्रणा भाजपच्या प्रतिमा निर्मितीसाठी झटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने निर्माण केलेल्या 'वॉररूम' मधून प्रचारक शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्यांना फोन करीत आहेत. आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करणार ना? अशी विचारणा केली जाते.

भाजप कॉल सेंटरमधून शुक्रवारी दुपारी असाच एक कॉलला चांदवड येथील शेतकरी नामदेव गणपत पवारांना आला. त्यावेळी पवारांनी या भाजपच्या प्रचारकाला शेलक्या शब्दात झापले. आता या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून जिल्हाभर व्हायरल होत आहे. त्यामुळे भाजपने घेतलेल्या शेकऱ्यांविरोधी निर्णयांची पुन्हा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय ?

भाजपच्या (BJP) प्रचारकाने, पवारांना विचारले की आपणास घरकुल मंजूर झाले असून त्याचे अनुदान देखील मिळाले आहे. हे खरे आहे ना? त्यावर शेतकऱ्याने, हो असे उत्तर दिले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत देशात किती योजनांची अंमलबजावणी झाली याची माहिती देत संबंधितांनी आपण भाजपला मतदान करणार ना? अशीही विचारणा केली. प्रचारकाचे सर्व ऐकून घेतल्यानंतर पवारांनी उत्तर दिले.

शेतकरी नामदेव पवार म्हणाले, मला घरकुलासाठी 1.20 लाख अनुदान मिळाले. त्यामध्ये माझ्या घराच्या भिंतीही झाल्या नाहीत. कर्ज घेऊन घर पूर्ण करावे लागले. हे कर्ज फिटेल म्हणून कांदा लावला होता. निर्यातबंदी केल्यामुळे एका रात्रीत आम्ही कंगाल झालो. चाळीस रुपयांवरून दर पंधरा रुपयांवर आले. कांदा निर्यातबंदी केल्यामुळे बांगलादेशाने द्राक्ष, टोमॅटो आणि संत्री यावर 104 रुपये किलो आयात शुल्क लावले. त्यामुळे आज द्राक्ष जबरदस्तीने दहा रुपये किलोने विकावे लागत आहे, याकडेही लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप आता शेतकऱ्यांना कंगाल करून आनंद साजरा करीत आहे. फोन करून मतदान करणार ना? असे विचारता. तुम्हाला काही वाटते की नाही? शेतकरी तुम्हाला कधीही मतदान करणार नाही, असे निक्षून सांगत या शेतकऱ्याने भाजपच्या प्रचारकाला चांगलेच फैलावर घेतले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवत आहेत. त्यात त्यांना नाशिकच्या शेतकऱ्याकडून मिळालेला हा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT