Mumbai Political News : भाजप आमदार गणपत गायकवाडांनी, शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाडांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या प्रकरणी पोलिस तपास करतील. त्यानुसार आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मत खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केले.
गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) हे खासदार शिंदेंचे कट्टर समर्थक आणि मित्र आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी रुग्णालायत जाऊन जखमी गायकवाड आणि राहुल पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आरोपींसह त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबाबत सूचक वक्तव्य केले.
दरम्यान, आमदार गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) आपल्या जीवावर बेतत असल्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगितले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात बावनकुळेंनी, गायकवाड यांनी त्यांच्या संरक्षणार्थ मोठे पाऊल उचलल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले. यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, कोण काय म्हणते, याला महत्त्व नाही. आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात गोळीबाराचा सर्व प्रकार कैद झाला आहे. आता हे गोळीबार प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस चौकशी करुन कारवाई करतील, असा इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गोळीबारात जखमी झालेल्या गायकवाड आणि पाटलांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. महेश यांच्या शरीरातून सहा तर राहुल यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. दोघेही सुखरुप बाहेर पडतील, त्यासाठी जे काही करता येईल ते केले जाईल, हे सांगताना श्रीकांत शिंदे भावूक झाले होते.
दरम्यान, भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनी स्वतः गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच मुलाला धक्काबुक्की झाली ती सहन न झाल्याने स्वसंरक्षणार्थ मीच पोलिसांसमोरच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे स्वतः आमदार गायकवाडांनी सांगितले. या प्रकरणात आमदार गायकवाडांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी विधीमंडळाला ई-मेलद्वारे कळवली आहे. आता दोन दिवस विधीमंडळाला सुट्टी असून यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर सोमवारी माहिती घेतील.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.