उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan : चर्चा तर होणारच! महाजन पालकमंत्री होताच मंगेश चव्हाण ‘फर्स्ट’; नाशिकचे आमदार पडले मागे, भाजपचा नवा प्रोटोकॉल?

Mangesh Chavan and Nashik BJP Political Equation : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजप नेते व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल नाशिकच्या महापौरांनी विविध वर्तमानपत्रात शुभेच्छा जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधील छायाचित्रांचा क्रम चर्चेत आला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी विविध वर्तमानपत्रात शुभेच्छा जाहिरात दिली आहे. मात्र, या जाहिरातील प्रोटोकॉलची सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रीपद जाहीर झाल्याने काल भाजप कार्यालयात ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी करत आंनदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून तर नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला.

दुसऱ्या दिवशी विविध वर्तमानपत्रात त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा जाहिरात दिली. महापौरांनी दिलेल्या या जाहिरातीतील फोटो क्रमामुळे भाजपच्या स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

त्याचे कारण असे की, या जाहिरातीत नाशिकमधील भाजपचे स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, भाजपमधील प्रचलित राजकीय प्राधान्यक्रमाचा विचार करता नाशिकमधील भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि शहरातील तीन आमदारांचे छायाचित्र सुरुवातीला असणे अपेक्षित मानले जाते.परंतु नाशिकच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या फोटोच्या आधी मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे महापौरांनी दिलेल्या या जाहिरातीचा प्रोटोकॉल किंवा क्रम चर्चेत आला आहे.

या जाहिरातीत भाजप शहाराध्यक्ष सुनिल केदार, तसेच तीन टर्मचे आमदार असलेल्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर यांच्याही आधी मंगेश चव्हाण यांचे छायाचित्र आहे. शहाराध्यक्ष सुनिल केदार, त्यानंतर अनुक्रमे आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी आदी भाजप नेत्यांचा समावेश आहे.

नाशिकशी थेट संबंध नसलेल्या चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण यांना शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपेक्षा आधी स्थान देण्यात आल्याने या जाहिरातीमागे नेमका राजकीय संदेश काय? अशी चर्चा आता भाजपच्या स्थानिक वर्तुळात सुरू झाली आहे.

यापूर्वीही नाशिकच्या भाजपच्या राजकारणात मंगेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा झाली होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कुंभ मंथन बैठकीत आमदार राहुल ढिकले वगळता नाशिकच्या इतर दोन्ही आमदारांना निमंत्रण नव्हतं मात्र, या बैठकीला चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे नाशिकमधील स्थानिक नेते, आमदार यांच्या भुवया त्यावेळी उंचावल्या होत्या. नाशिकच्या राजकारणात जळगावच्या आणखी एका नेत्याची एण्ट्री होत असल्याची चर्चा झाली होती. आता पुन्हा महापौरांच्या जाहिरातीत स्थानिक आमदारांच्या आधी त्यांचा फोटो आल्याने भाजपच्या गोटात चर्चांना उधाण आलं आहे.

राजकीय जाहिरातींमध्ये नेत्यांच्या छायाचित्रांचा क्रम हा केवळ डिझाइनचा भाग नसतो, तर त्यातून राजकीय महत्त्व आणि प्राधान्यक्रमाचा संदेश दिला जातो, असे मानले जाते. त्यामुळे मंगेश चव्हाण यांना स्थानिक आमदार आणि शहराध्यक्षांच्या आधी स्थान देण्यामागे नेमका निर्णय कोणाचा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ही जाहिरात महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या नावाने प्रसिद्ध झाली असली, तरी जाहिरातीतील छायाचित्रांचा क्रम नेमका कोणी निश्चित केला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. स्थानिक भाजप नेतृत्वाच्या प्रोटोकॉलचा विचार करण्यात आला होता का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीनंतर भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण असतानाच महापौरांच्या शुभेच्छा जाहिरातीतील छायाचित्रांच्या क्रमाने नवा राजकीय संदेश दिला आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक आमदारांच्या आधी मंगेश चव्हाण यांना मिळालेलं स्थान हा केवळ योगायोग आहे की आगामी राजकीय समीकरणांची चाहूल, याबाबत आता भाजपच्या वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, एरवी मंगेश चव्हाण यांच्या नाशिकमधील ‘ढवळाढवळी’वरून अस्वस्थ होणारे नाशिकचे लोकप्रतिनिधी आता त्यांनाच स्वतःच्या आधी स्थान देताना दिसत आहेत. नाशिकच्या लोकप्रतिनिधींची ही मजबुरी आहे की, त्यांनी महाजनांप्रमाणे आता चव्हाण यांनाही स्विकारलंय? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. कुंभमेळ्याच्या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीवरून नाशिकचे आमदार अस्वस्थ झाले होते. आता महापौरांच्या जाहिरातीत नाशिकच्या आमदारांनाही मागे टाकत चव्हाण यांचा फोटो ‘फर्स्ट’ आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT