Lasalgaon Sarpanch election : देशातील कांद्याची राजधानी असलेल्या लासलगाव ( Lasalgaon ) ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक अगदी मंत्र्यांनीही प्रतिष्ठेची केल्याचे बोलले जात आहे. या ग्रामपंचायतीवर आपला ताबा मिळविण्यासाठी सदस्य फोडण्यापासून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानं सर्व राजकारणावर पाणी पडलं आहे.
लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून तिचा नावलौकिक आहे. या ग्रामपंचायतीवर आपला ताबा मिळविण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. ही ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहण्यासाठी चक्क मंत्र्याच्या कारभाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचं बोललं जातं. सदस्यसंख्येचे गणित देखील त्यांनी जुळविले होते. पण, यातील दुसऱ्या गटाने ऐनवेळी थेट मुंबईत संपर्क करून संबंधित मंत्र्याच्या नेत्यामार्फत या निवडणुकीला स्थगिती मिळविल्याची चर्चा सुरू झाल्याने लासलगावचे राजकारण तापले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लासलगाव ग्रामपंचायत जयदत्त होळकर हे विद्यमान सरपंच आहेत. होळकर आणि नानासाहेब पाटील गटाचे दहा सदस्य होते. विरोधी भाजपचे नेते डी.के. जगताप यांच्याकडे सात सदस्य होते. त्यांना थेट मंत्र्यांचे पाठबळ होते. अंतर्गत वाटाघाटीनुसार पाटील आणि होळकर दोघांनाही प्रत्येकी अडीच वर्षे सरपंच पद ठेवण्याचा करार होता. त्यानुसार होळकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी गुरूवार ( 8 फेब्रुवारी ) निवडणूक होणार होती. मात्र, त्यात गेल्या काही दिवसांतील मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे येथील समीकरणे बिघडली.
भाजपचे जगताप यांनी काही अदृश्य शक्तींच्या मदतीने सत्ताधारी गटातील चंद्रशेखर होळकर, अल्ताफ शेख आणि रामनाथ शेजवळ या तीन सदस्यांना आपल्याकडे वळविले होते. त्यानुसार जगताप गटाकडे बहुमत झाले होते. त्यामुळे जगताप गटाचा सरपंच देखील निश्चित झाला होता. मात्र, मतदान सुरू होण्यापूर्वीच ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेल्या सरपंचाची सही जुळत नसल्याचे कारण देत निवडणुकीला स्थगिती दिली.
अतिशय मोठ्या राजकीय आणि अन्य बळाचा वापर करून लासलगावमध्ये सत्तांतराचे नाट्य घडणार होते. याची कुणकुण लागल्यानेच सत्ताधारी गटाने आपली सत्ता वाचवण्यासाठी थेट मुंबईतील एका मंत्र्यांशी संपर्क केला. त्यात अतिशय वेगवान घडामोडीत भाजपचे डी.के.जगताप यांच्या राजकीय मनसुब्यांवर पाणी फिरवले आहे. दोन मंत्र्यांनीच ग्रामपंचायतील एका गटाला हा जोरदार धक्का दिला आहे. देशातील नावाजलेली ग्रामपंचायत अशी प्रतिमा असलेल्या लासलगावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे गावात एका गटावर निराशा तर दुसऱ्या गटात आनंदाचे वातावरण आहे. सबंध जिल्ह्यात येथील राजकीय घडामोडी चर्चेचा विषय आहे. ऐनवेळी स्थगिती मिळविण्यात कोणत्या मंत्र्याचा हात असावा? याविषयी कयास लावले जात आहेत.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.