Eknath Shinde- Chhagan Bhujbal-Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency 2024 : मतदारसंघ शिंदेंचा, धावपळ फडणवीसांच्या शिलेदाराची अन् दावेदारी भुजबळांची !

Sampat Devgire

Girish Mahajan News : नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाचा आहे. त्यावर अनेकदा स्पष्टीकरणदेखील झाले आहे. मात्र महायुतीतील शहकाटशहाच्या राजकारणामुळे तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या मार्गात काटे पेरले. त्यातून आता महायुतीने स्वतःचीच वाट बिकट केली आहे.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा या जागेवर प्रबळ दावा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते निवडणुकीची तयारी करीत आहेत. प्रचाराचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. मात्र ऐनवेळी खासदार गोडसे यांना अपशकुन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने चाल केली. त्यातून हा मतदारसंघ कोणाचा हा वाद गेले दोन महिने सुरू आहे.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरदेखील महायुती मधील हा वाद मिटलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची तारांबळ झाली आहे. त्यातच आता रोज नव्या इच्छुकांची नावे पुढे येत आहे. सोमवारी शांतिगिरी महाराज यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याचा दावा करीत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या तीन मे रोजी खासदार हेमंत गोडसे हेदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या परिस्थितीत मतदारसंघ कोणाला? आणि उमेदवार कोण? यावरून राजकीय गोंधळ आहे.

गोंधळात भर टाकणाऱ्या हालचाली आज भारतीय जनता पक्षाकडून झाल्या. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (GIRISH MAHAJAN) यांनी आज नाशिकचा दौरा केला. या वेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या सर्व वेगवान हालचाली लक्षात घेता यातील बऱ्याचशा गोष्टी पूर्वनियोजित होत्या की काय असा संशय येतो.

नाशिक (NASHIK) हा मतदारसंघ शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा आहे. मात्र मंगळवारी दिवसभर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांची धावपळ सुरू होती. सायंकाळी त्यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर भुजबळ कुटुंबीय पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी दावेदार आहेत की काय? असे संकेत मिळाले. त्यामुळे निवडणूक अगदी तोंडावर असतानाही महायुतीतील पक्षांनी कितीही एकोपा दाखविला तरी त्यांचे आपसात जमत नाही, हे स्पष्ट होत आहे. या राजकीय वादाचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरदेखील होणार आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक पुढे जात आहे तस तसा महायुतीतील घटक पक्षांचा विसंवाद प्रकर्षाने पुढे येऊ लागला आहे.

नाशिक मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सोडवला होता. तीन आठवड्यांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर गोडसे यांनी खूप आधीपासून आपल्या प्रचार सुरू ठेवला होता. या स्थितीत अन्य पक्षांना कोणताही हस्तक्षेप करण्याची संधी नव्हती. मात्र, ऐनवेळी त्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली. सुमारे महिनाभर भुजबळ की गोडसे अशी चर्चा सुरू होती. यामध्ये भारतीय जनता पक्ष भुजबळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकत आहे, असा संदेश जात होता. आजच्या घडामोडींवरून पुन्हा एकदा त्याची उजळणी झाली. त्यामुळे नाशिक मतदारसंघातून आता फक्त गोडसे की भुजबळ हाच प्रश्न शिल्लक राहिला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT