Eknath Shinde, Pravin Tidme  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Deputy Mayor : नाशिकच्या उपमहापौरपदावरून शिंदे शिवसेनेत नाराजीचा स्फोट, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार..

Pravin Tidme Decided to Resign : प्रवीण तिदमे यांना नाशिकचे उपमहापौर केले गेले नाही म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजय बोरस्ते व विलास शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : शिवसेना (शिंदे गटात) उशिरा दाखल झालेले विलास शिंदे यांना नाशिकचे उपमहापौरपद दिल्याने शिवसेना (शिंदे गटात) नाराजीचा स्फोट झाला आहे. पक्षातील अन्याय व दुजाभावाला कंटाळून पक्षाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्यापदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवीण तिदमे यांनी देखील उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाने त्यांना त्यांचा अर्ज माघारी घ्यायला लावत विलास शिंदे यांना उपमहापौरपदाची संधी दिली. त्यामुळे उपमहापौरपदी डावलल्याच्या नाराजीतून प्रवीण तिदमे यांनी साहेब, आम्ही कुठे कमी पडलो ?असा सवाल पक्षप्रमुखांना करत, पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी (दि. ९) मी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा पक्ष नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब व मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दुपारी ४.३० वाजता मा. नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करणार आहे अशी माहिती तिदमे यांनी माध्यमांना दिली.

भाजपने काल महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सोबत घेतले. मात्र उपमहापौरपदावर पक्षात उशिरा दाखल झालेले विलास शिंदे यांना संधी दिली गेली. त्यामुळे तिदमे यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केलेलं पत्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. तिदमे यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे साहेबांवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा नाशिक मधून माझ्या राजकीय भविष्याची चिंता न करता नाशिक मधून मी सर्वप्रथम शिंदे साहेबांसोबत गेलो. नाशिकमध्ये शिवसेनेचा काळ अत्यंत कठीण असताना, कोणतीही अट-शर्त न ठेवता आणि कोणताही राजकीय सौदा न करता मी सर्वप्रथम पुढे येऊन शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाशी थेट संघर्ष करत, अनेक शिवसैनिक सोबत घेत संघटना उभी केली. पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून नोकरीसुद्धा सोडली.

सात वर्षांपासून असलेले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद आणि नाशिक महानगरपालिकेत असलेल्या केबिनचा पण त्याग केला. शाखा प्रमुख म्हणून गल्लीतून सुरुवात करून उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उप-महानगर प्रमुख, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख आणि पुढे महानगर प्रमुख असा संपूर्ण संघर्षाचा प्रवास मी पदासाठी नव्हे, तर शिवसेना वाढवण्यासाठी केला. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोणाचाही असो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आघाडी घेतली.

माझ्या महानगर प्रमुख पदाच्या कार्यकाळात नाशिक शहरात नगरविकास निधीतून ३०० कोटींपेक्षा अधिक विकासकामे मार्गी लावली. नगरविकास निधी काय असतो हे तेव्हा नाशिकला माहित झाले. स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता, इतर नगरसेवकांच्या प्रभागासाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने धावपळ केली. पण, आज निष्ठावंत व संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

अजय बोरस्तेंवर निशाणा

एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाच वेळीशिवसेना जिल्हा प्रमुख, उपनेते पद, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद,नाशिक महापालिका गटनेते अशी चार महत्त्वाची पदे देण्यात आली. त्यानंतरही अजय बोरस्ते यांनी सतत मीडियात बातम्या पेरल्या की, कार्यकारिणी बदलणार, महानगरप्रमुख बदलणार, सोशल मीडियावर पक्षाबद्दल संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे, अनेक पक्ष प्रवेश ही थांबले. पण, कुणीच लक्ष दिले नाही.

विलास शिंदेंच्या निवडीने डावलल्याची भावना

तसेच, दीड-दोन वर्षांनंतर पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना नाशिकचे सह-संपर्कप्रमुख पद आणि आता उपमहापौर पद अशी दोन पदे देण्यात आली. एकीकडे संघर्ष, निष्ठा आणि संघटन उभारणी करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात आहे आणि दुसरीकडे सौदेबाजी करून आलेल्यांना पदांची खैरात होत आहे, यामुळे पक्षातील अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे अशी भावना प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT