नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि युवासेना यांच्यात जोरदार बिनसले आहे. हे प्रकरण इतके ताणले गेले आहे, की युवासेनेने मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी 'सरकारनामा'ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून वास्तव शोधण्याचे काम दादा भुसे (Dada Bhuse) करणार आहेत. शिवसेनेची (Shivsena) पक्ष म्हणून वाढ होत नसताना तिदमे आणि काही पदाधिकारी फक्त टेंडरकामांमध्येच लक्ष घालतात, असा गंभीर आरोप युवासेनेकडून करण्यात आला. शिवसेनेतील या खदखदप्रकरणी ‘सरकारनामा’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने युवासेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) उभी राहिली. शहरातील शिवसेनेचा गड असलेल्या सिडको आणि नाशिकरोड परिसराची एकजूट ठेवण्यात ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) यश आले, तर शिंदे गटाकडे (Eknath Shinde) शालिमार येथील शिवसेना कार्यालय आले. शिवसेनेने अजय बोरस्ते यांच्याकडे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. पण पक्षाचा मोठा कार्यक्रम आयोजित करणे अथवा पक्षप्रवेश वाढवणे किंवा शाखांचा विस्तार करणे ही कामे ठप्प झाली.
वरिष्ठ पातळीवर अत्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाते. प्रत्यक्ष स्थिती आणि वर जाणारे अहवाल यात मोठी तफावत असल्याचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यातच युवासेना पदाधिकाऱ्यांचा फक्त वापर होत असल्याची भावनाही वाढीस लागली. हळूहळू याची दबक्या आवाजातील चर्चा सुरू झाली आणि वाढलीही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
26 जानेवारी रोजी तर युवासेनेने (Yuvasena) पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कारच टाकला होता. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनुसार, प्रवीण तिदमे मनमानी करतात. त्यांचे लक्ष फक्त महापालिकेतील टेंडरपुरते आहे. त्यांना पक्षाशी कसलेही घेणे-देणे नाही. या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत दोन दिवसांत निर्णय देतो, असे आश्वासन दिले. मात्र, युवासेना पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून घ्यावा. आमचे आरोप किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होऊ द्या, अशी विनंती केली.
पूर्वी दोन किंवा तीन महानगरप्रमुख नियुक्त व्हायचे. आताही तीच पद्धत वापरा, अशी मागणी युवासेना पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, कॅबिनेट बैठक संपली की लागलीच दूध का दूध आणि पानी का पानी करू, असे आश्वासन दादा भुसे यांनी दिल्याने हे पेल्यातील वादळ ठरणार की पक्षाला याचा फटका बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.