“Dada Bhuse jokes about the Nashik Guardian Minister post, saying the matter may need to be taken to U.S. President Donald Trump.” Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Politics : पालकमंत्रिपदाचा वाद; दादा भुसेंची खदखद बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेत नेत्यांच्या क्षमतेवरच ठेवलं बोट...

Dada Bhuse’s Humorous Take on Nashik Guardian Minister Post : आगामी महापालिका निवडणुकांची तयारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी आज नाशिक शहरात कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात आले.

Sampat Devgire

Nashik Guardian Minister news : नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता अनेकांची डोकेदुखी ठरला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्याबाबत आपली घालमेल व्यक्त केली. त्यामुळे हा विषय आता राजकीय गुंतागुंत वाढवण्याची चिन्हे आहेत. आज दादा भुसे यांची याबाबतची खदखद बाहेर आली. त्यांनी कुणाचंही नाव न घेता नेमका निशाणा साधल्याची चर्चा आहे.

नाशिकचे पालकमंत्रिपद रिक्त असल्याने त्यावर सातत्याने राजकीय वाद आणि महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. भुसे हे देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, हे लपून राहिलेले नाही. युतीतील वाद मिटवण्यात हातखंडा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाचा वाद सोडवता आलेला नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये घालमेल आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची घोषणा केव्हा होणार? यावर बोलताना आज भुसे मिश्किलपणे म्हणाले, ‘आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा विषय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल.’ भुसे यांचे हे विधान उपस्थितांत खसखस पिकवून गेले. एकप्रकारे महायुतीमध्ये हा मुद्दा प्रचंड वादाचा बनल्याचेच संकेत भुसे यांनी दिले आहे. फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही यातून मार्ग कसा काढायचे, याचे कोडे सोडवता येईना, अशी स्थिती असल्याचे भुसे यांनी एकप्रकारे सांगून टाकल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांची तयारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी आज शहरात कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आगामी निवडणुका जिंकण्याच्या टिप्स देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती बाबत निर्णय घेतील. शिवसेनेने महापालिका निवडणुकीबाबत बुथप्रमुखांची कार्यशाळा घेतली. येथे निवडणुकीत पक्षाकडून काही तांत्रिक मार्गदर्शन व नवीन ॲप वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञांनी बुथ प्रमुखांचा सराव करून घेतला.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे. युतीचा घटक म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणूक जिंकणे हे आमचे पहिले प्राधान्य असेल, अशी माहिती भुसे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे याचा निर्णय पक्षनेते शिंदे घेतील. उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता हाच मुख्य निकष असेल. आगामी निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी प्रसंगी दोन पावले मागे जाण्याची ही पक्षाची तयारी आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला भुसे यांनी उत्तर दिले. सुषमा अंधारे यांना पक्षात येऊन किती दिवस झाले?, असा प्रश्न त्यांनी केला. सुषमा अंधारे यांनी टीका करताना आपले स्थान काय आहे, याची जाणीव ठेवलेली बरी. माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना वाढीमध्ये मोठा वाटा आहे. ज्या अनेक नेत्यांनी शिवसेना वाढीत योगदान दिले त्यात कदम यांचा समावेश आहे. छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील यामध्ये प्रमुख आहेत. हे सर्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार होते, असे भुसे म्हणाले.

अंधारे यांना शिवसेना किती माहिती आहे, हा प्रश्नच आहे. अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली ते किती दिवसांपासून शिवसेनेत कार्यरत होते, याची माहिती त्यांना असायला हवी. त्यामुळेच अंधारे यांनी टीका करताना विचार करावा, असा सल्ला शिक्षण मंत्री भुसे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT