Nashik Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : सुरक्षेचा अतिरेक, नाशिककरच राहिले वंचित; सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यातील उणिवांचा मंत्री महाजन घेणार आढावा

Girish Mahajan to Review Kumbh Kumbh Flag Hoisting : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा (२०२७) ध्वजारोहण सोहळ्यातील सुरक्षिततेचा अतिरेक व सोहळ्यापासून मूळ नाशिककरांनाच दूर राहावे लागल्याने प्रशासनावर टीका होत आहे.

Ganesh Sonawane

Nashik Simhastha Kumbh 2027 : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ झाला. इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण करण्यात आले. पण, सोहळ्यातील सुरक्षिततेचा अतिरेक व सोहळ्यापासून मूळ नाशिककरांनाच दूर राहावे लागल्याने प्रशासनावर टीका होत आहे.

यासर्व पार्श्वूभूमीवर पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन लवकरच यंत्रणांचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत सोहळ्यातील ध्वजारोहण सोहळ्यातील चांगल्या बाबी तसेच उणिवांवर मंथन केले जाणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी रामतीर्थावर (रामकुंड) ध्वजारोहण झाले. त्र्यंबकेश्‍वरला कुशावर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. दरम्यान, नाशिकला ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली. त्र्यंबकेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

त्यानंतर सायंकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा नाशिकमध्ये गोदाघाटावर महाआरती झाली. तब्बल ६५०० आदिवासी बांधवांच्या हस्ते झालेल्या या गोदाआरतीची जागतिक स्तरावर नोंद झाली. परंतु या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याला तसेच गोदाआरतीत सहभागी होता न आल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रपती येणार म्हणून प्रोटोकॉलनुसार शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मात्र, सुरक्षिततेच्या नावाखाली अतिरेक झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रशासनाने पास देऊनही नाशिकरांना कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. या सोहळ्यापासून मूळ नाशिककरच वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्ष कार्यक्रमात महापालिकेच्या नगरसेवकांना देखील त्रास सहन करावा लागला. बसायला अपेक्षित जागा मिळाली नाही म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून रविवार कारंजा, पंचवटी परिसरासह शहराच्या मध्यवर्ती भागातील छोट्या-छोट्या गल्ली बॅरिकेटींग करून बंद करण्यात आल्या. परिणामी स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने छोटे-मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचा रोजगार बुडाला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता ध्वजारोहण सोहळ्यातील उणिवांवर मंथन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आठवड्याभरात यासंदर्भात बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये सोहळ्याचे नियोजनात सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांना त्यांना आलेले अनुभव, उणिवा तसेच चांगल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.

गर्दी नियोजनाच्या आराखडा तयार करणे, प्रमुख मार्गांवर मार्गदर्शक फलक लावणे, स्थानिकांचा सहभाग अधिकाधिक वाढविणे, सुरक्षिततेच्या अतिरेक टाळण्याबाबत उपाययोजना या बाबींवर विचारमंथन केले जाणार आहे. या चर्चेतून पुढे येणाऱ्या सूचना व परिणामकारक गोष्टींचा अवलंब करून आगामी कुंभमेळ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT