Nashik Kumbh Mela  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्र्यांची ग्वाही : 'जग थक्क होईल' असा कुंभमेळा होणार ! बैठकीत काय काय झालं?

Maharashtra CM Devendra Fadnavis promises a grand Nashik Kumbh Mela 2027 : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १३ आखाड्यांच्या साधु- महतांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत कुंभमेळा, अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १३ आखाड्यांच्या साधु- महतांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत कुंभमेळा, अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. सहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा अंतिम टप्प्यांत आहेत. या निविदांना लवकरच मान्यता देण्यात येईल. तसेच, सर्व कामे पूर्ण केली जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रारंभी सर्व साधू, महंतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व साधू, महंतांचे शासनातर्फे स्वागत केले.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे, असं फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महंतांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.

गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत. गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येत आहेत. नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेवून शासन आवश्यक नियोजन करेल, असे नमूद करतांना फडणवीस पुढे म्हणाले, आखाड्यासाठी आवश्यक सुविधा उपालब्ध करून देण्यात येतील. साधूग्रामची जागा कायमस्वरूपी उपयोगात यावी यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी शहरात रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे. कुशावर्त येथे गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीच्या विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या घाटांचे संवर्धन करण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाविक आणि साधू - महंतांची सुरक्षितता महत्वाची असल्याने नियोजन करतांना सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान असणार आहे. तीन अमृत स्नानसोबत इतर पर्वस्नान होणार आहेत. कुंभमेळ्याची कामे वेगाने सुरू असून ४ हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच २ हजार ६०० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. ही सर्व कामे जानेवारी २०२७ पूर्वी पूर्णत्वास येतील. या कामांसाठी सर्व आखाड्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा चांगला आणि सुरक्षित होईल. इथे येणाऱ्या साधू-महंतांना सुखद आणि पावन अनुभव येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध आखाड्याच्या साधू-महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी श्री रामानंद निर्मोही आखाडा, निर्मोही अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा श्री पंचायती उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते.

नाशिक कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी (स्थळ-रामकुंड पंचवटी)

प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७,आषाढ सोमवती अमावस्या.

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या

तृतीय अमृतस्नान-शनिवार ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध एकादशी

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,

प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या

तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).

पालकमंत्र्यावरून अडलंय कुठे ?

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा घोषित करण्यात आल्या. पण, नाशिकचा पालकमंत्री जाहीर करण्यासाठी अद्यापही मुहूर्त लागला नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना करण्यात आला असता त्यास उत्तर देताना अमृत स्नान व पालकमंत्रिपद हे विषय एकमेकांना जोडणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. पालकमंत्री येत-जात असतात. त्यावरुन काही अडलंय का, असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT