Nashik Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election 2024 : 'शांतिगिरी महाराज माघार घेणार? महायुतीच्या संकटमोचकांनी घातली गळ...

Girish Mahajan News : शांतिगिरी यांनी यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी माघार घ्यावी,' अशी विनंती त्यांनी केली.

Sampat Devgire

Nashik News : शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबाबत आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी दावा केला होता. त्यांचे म्हणणे होते. मात्र आता अवघ्या चोवीस तासांच्या आत त्यांना निडणुकीतून माघार घ्या, यासाठी भाजपकडून विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून अजूनही सस्पेन्स संपला नसल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

'नाशिक मतदारसंघात आज अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकला भेट दिली. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. शांतिगिरी यांनी यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी माघार घ्यावी,' अशी विनंती त्यांनी केली. या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. शांतिगिरी महाराज आपल्या उमेदवारीवर कायम राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात महाजन म्हणाले, "शांतिगिरी महाराजांनी 2014 तसेच 2019 दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांचा भक्त वर्ग नाशिक, शिर्डी, औरंगाबाद यांसह विविध मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी करण्यावर भर आहे. पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मलाच संसदेत जायचे आहे, असा आग्रह त्यांनी या वेळी केला. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी उमेदवारीच्या आग्रहाला मुरड घालावी, अशी विनंती त्यांना केली आहे."

महाजन यांनी सायंकाळी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली. "येत्या दोन दिवसांत नाशिक मतदारसंघाचा तिढा सुटेल. सर्वात आधी ही जागा कोणत्या पक्षाला द्यायची याचा निर्णय होणार आहे. त्यानंतरच उमेदवारीचा विषय मार्गी लागेल. स्थानिक नेत्यांची झालेली चर्चा वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करून निर्णय घेतील," असे महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले.

आज झालेल्या वेगवान घडामोडी पाहता भाजप नाशिक मतदारसंघाबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडणार, असे स्पष्ट झाले आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करतील. तोपर्यंत नाशिकच्या (Nashik) जागावाटपाचा तिढा सुटून उमेदवार जाहीर होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे आज कोणाला उमेदवारी जाहीर होते, या प्रतीक्षेत असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT