Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने निवडणूक प्रक्रिया सुरु होऊन तीन दिवस उलटले तरी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशात आता महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीच्या मैदानात एण्ट्री घेतली आहे.
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी अधिसूचना जाहीर होऊन तीन दिवस झाले. गुरुवारी (दि. २७) तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून निवृत्ती बोडके यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने या निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही उतरला आहे. राष्ट्रवादीकडून आता आणखी काही इच्छुक पुढे येण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिवसभरात चार इच्छुकांनी सात नामनिर्देशनपत्रांची खरेदी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
नाशिकची जागेवरुन शिवसेना व भाजपमध्ये स्पर्धा रंगली आहे. सर्वांधिक संख्याबळ असल्याचं सांगत भाजपने या जागेवर दावा केला आहे. तर गेल्यावेळी आमचा आमदार होता याचा दाखला देत शिवसेनेकडून या जागेवर दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात रस्सीखेच असताना राष्ट्रवादीनेही आता निवडणूकीत उडी घेतली आहे. पक्षातर्फे तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले निवृत्ती बोडके यांनी दोन नामनिर्देशनपत्रे नेली. भाजपकडून इच्छुक असलेल्या बाळकृष्ण माळी, भूषण कासलीवाल यांनी अर्ज खरेदी केले. याशिवाय विजय धारराव यांनी अपक्ष अर्ज खरेदी केला.
शिवसेना-भाजपमध्ये या जागेवरुन ओढाताण सुरु असताना राष्ट्रवादी शांत होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी अर्ज नेल्याने महायुतीमधील तीन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होते की काय असे वाटू लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु असून सत्तारुढ पक्षाच्या विरोधात लढण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात २४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांसोबतच समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अपक्ष इच्छुक असलेल्यांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २८) बकरी ईदची सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया बंद असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.