

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीचा धुराळा उडणार असून सोमवार (दि. २५)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. भाजपचे चांदवड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी पहिल्याच दिवशी अर्ज नेला. त्यामुळे केदा आहेर नक्की कोणाकडून लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या केदा आहेर यांच्यासह पहिल्याच दिवशी पाच इच्छुकांनी आठ अर्ज नेले. पण महायुतीमधील शिवसेना व भाजपमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु असून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. तसेच महाविकास आघाडीमध्येही उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
विधानसभेला देखील केदा आहेर भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक होते. पंरतु भाजप पक्षश्रेष्ठींनी अखेरच्या क्षणी राहुल आहेर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या केदा आहेर यांनी बंधू राहुल आहेर यांच्याविरोधात बंडखोरी करत अपक्ष शड्डू ठोकला होता. या निवडणुकीपासून आहेर बंधूंचे संबंध बिघडले. आता केदा आहेर हे पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले केदा आहेर भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करु शकतात.
परंतु भाजपमध्ये आधीच इच्छुकांची संख्या मोठी आहे. गणेश गिते, नीलेश बोरांसह डजनभर इच्छुक आहेत. अशात विधानसभेची पाश्वभूमी पाहाता केदा आहेर यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याला सर्वपक्षीय मतदान होऊ शकते असे त्यांचा दावा आहे. या शिवाय महाविकास आघाडी देखील त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
विधानपरिषदेच्या जागेसाठी उपलब्ध आकडेवारीनुसार ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यात महायुतीकडे सर्वांधिक ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७ सदस्य आहेत. तर महाविकास आघाडीकडे तुलनेने कमी संख्याबळ आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ४५, काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. याशिवाय इस्लाम पार्टीचे ३५, 'एमआयएम'चे २१, अपक्ष व इतर ४१ सदस्य आहेत.
वरील आकडेवारीनुसार भाजप व शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत झाली. तर राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशापरिस्थितीत शिवसेनेकडे १७१ मतदार आहेत. तर भाजप व राष्ट्रवादी मिळून २९५ मतदार होतात. अशास्थितीत केदा आहेर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली व महाविकास आघाडीने इस्लाम, 'एमआयएम व समाजवादी व इतर काही अपक्षांची मोट बांधल्यास केदा आहेर तुल्यबळ उमेदवार ठरु शकतात असे दिसते.
पहिल्या दिवशी यांनी नेले अर्ज
केदा आहेर (अपक्ष)
फिरोज शेख (अपक्ष)
प्रतीक खरोटे (अपक्ष)
सचिन सस्कर (अपक्ष)
अजित पवार (अपक्ष)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.