Nashik Politics : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण थंडीचे दिवस असूनही चांगलेच गरम झाले होते. उमेदवारीवाटपावरून निष्ठावंत विरुद्ध आयारामांमध्ये रंगलेला संघर्ष आणि त्यानंतर एबी फॉर्मवाटपावरून झालेल्या राड्यानंतर उभे ठाकलेले बंडखोरीचे आव्हान थोपवण्यासाठी स्वत: मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते.
गिरीश महाजनांनी नाशिक महापालिकेसाठी 'शंभर प्लसचा' नारा दिला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी इतर पक्षांमधील तगडे नेते गळाला लावत त्यांना भाजपत घेतलं. त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यातूनच भाजप निष्ठावंतांनी बंडखोरीचे हत्यार उपसले. ही बंडखोरी थंड करण्यात निवडणूक प्रभारी गिरीश महाजन यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन यांनी पूर्ण जोर लावला. बंडखोरांची मनधरणी केल्याने अनेक प्रभागात बंडखोरांचे आव्हान रोखण्यात महाजन यांना यश आलं. परंतु ते पूर्णपणे शंभर टक्के बंडखोरी रोखू शकले नाही. काही ठिकाणी बंडखोरांना थंड करण्यात त्यांना यश आलं असलं तरी अनेक ठिकाणी अपयश देखील आलं. कारण महाजन यांनी प्रयत्न करुनही अनेक प्रभांगामध्ये बंडखोरी कायम राहिली असून त्याचा फटका भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग १ मधून अमित घुगे, प्रभाग ३ मधून रूची कुंभारकर, प्रभाग ६ मधून सुनीता काकड, प्रभाग १० मधून शशिकांत जाधव, प्रभाग २९ मधून मुकेश शहाणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी कायम ठेवली. तसेच कमलेश बोडके, अशोक मुर्तडक, सतीश सोनवणे, गणेश मोरे यांनी भाजप उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
मुकेश शहाणेंना रोखण्यात महाजनांना अपयश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आल्यानंतर प्रभाग क्रमांक २५ मधून दीपक बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी माघार घेतली. त्यानुसार २५ मधील दोन जागांवर पक्षाने क गटातून भाग्यश्री ढोमसे व ड गटातून प्रकाश अमृतकर यांना पुरस्कृत केलं. परंतु प्रभाग क्रमांक २९ मध्ये दीपक बडगुजर यांनी माघार न घेतल्याने भाजपचा एबी फॉर्म मिळालेले माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली.
भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही अपवाद वगळता सर्व उमेदवारांनी माघार घेतली असून सर्वांनी भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. भाजपने १०० प्लसचा दिलेला नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते,बूथ प्रमुख,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी एकदिलाने काम करतील. सुनील केदार - अध्यक्ष भाजप नाशिक महानगर जिल्हा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.