Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Political News : भुसेंना आव्हान देणाऱ्या 'या' नेत्यांमागे लागलाय पोलिसांचा ससेमिरा

संपत देवगिरे ः सरकारनामा

Nashik News : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना उघड राजकीय आव्हान देणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या घटनेची आता चौकशी लावण्यात अली आहे. या प्रकरणाला हवा देण्यात दादा भुसे यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटांकडून करण्यात येत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) राजकारणात शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात पोलिसांतील खटल्यांच्या मालिकेनंतर आता नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरात सत्ताधारी आणि विरोधक सगळेच आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला फारसा सूर गवसलेला नाही. याउलट उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना मागे टाकत अत्यंत सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेने आपल्या कार्यक्रमांतून शिंदे गटाचे आमदार तसेच पालकमंत्री दादा भुसे यांना लक्ष्य केले होते. एमडी ड्रग्ज प्रकरण तसेच गिरणा सहकारी साखर कारखान्यासाठी संकलित केलेल्या निधीच्या गैरव्यवहाराविरोधात शिवसेनेने मोहीम उघडल्याने अस्वस्थ झालेल्या भुसे यांनी हे आव्हान स्वीकारत सत्तेची सावली काय असते, याची प्रचिती विरोधकांना दाखविल्याची चर्चा आहे. सध्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे (मालेगाव) आणि सुधाकर बडगुजर (नाशिक) या दोघांविरोधातही थेट आक्रमक भूमिका घेत त्यावर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनीच पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.

बडगुजर यांच्या विरोधात विधिमंडळात भाजपचे नीतेश राणे यांनी त्यांचा मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे छायाचित्र झळकावले. त्यानंतर काही मिनिटांतच नाशिकच्या शिंदे गटानेही छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करीत, त्याविरोधात निषेध आंदोलनदेखील केले. भाजपदेखील त्यात मागे राहिली नाही, त्यांनीही आंदोलन करीत शिवसेनेला अडचणीत लोटले. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी आधी हिरे, त्यानंतर बडगुजर यांची राजकीय शिकार केल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT