Sharad Pawar & Ajit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule NCP News : मुंबईतील दोन्ही मेळाव्यांत धुळ्यातील नेत्यांचा सहभाग

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षांतर्गत झालेल्या बंडानंतर धुळे जिल्ह्यातही पक्षात उभी फूट

Sampat Devgire

Dhule NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात उभी फूट पडल्यानंतर त्याचे प्रतिबिंब धुळे जिल्ह्यातही उमटले. ते मुंबईत अजितदादा आणि शरद पवार (साहेब) यांच्या बुधवारी (ता. ५) स्वतंत्रपणे झालेल्या मेळाव्यातून समोर आले. यातील सहभागातून धुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ताटातूट झाल्याने या पक्षात उभी फूट पडल्याच्या स्थितीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कुठले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे दादा आणि साहेब यांच्या गटात सहभागी झाले ते स्पष्ट झाल्याने संभ्रमावस्था दूर झाली आहे. (After the rebellion, the confusion in the Nationalist Party has been removed)

जिल्ह्यात (Dhule) एकमेव राजवर्धन कदमबांडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून २००४ ला आमदारकी मिळाली. तत्पूर्वी, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून १९९९ मध्ये विजयानंतर डॉ. हेमंत देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यमंत्रिपद बहाल केले. त्यामुळे १९९९ नंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आले. श्री. कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट केले. शिरपूर वगळता दोंडाईचा, धुळे, साक्री येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी सत्तेत राहिली.

दोन नेत्यांवर मदार

असे असताना राजकीय कलहातून नेते शरद पवार यांनी १० जून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत डॉ. देशमुख हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य झाले. त्यांनी नेते शरद पवार यांना साथ देणे पसंत केले. कालांतराने केंद्र व राज्य पातळीवर मोदी लाट आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील प्रभाव काहीसा ओसरत गेला. श्री. कदमबांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली. अशा मध्यंतरीच्या कालावधीत डॉ. देशमुख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर ते काही महिन्यांपूर्वी पुन्हा राष्ट्रवादीत परतले. राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांमुळे शिरपूर वगळता जिल्ह्यात या पक्षाचा जोर टिकून राहण्यास मोलाचा हातभार लागला होता.

पडदा पडला पण...

मोदी लाटेमुळे राजकीय पटलावर विविध घडामोडी घडत असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत राहण्यासाठी नेते शरद पवार यांनी एकेकाळचे कट्टर विरोधक अनिल गोटे यांना जवळ केले आणि त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपविली; परंतु राष्ट्रवादीच्या काही जुन्या फळीतील कार्यकर्त्यांना श्री. गोटे यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे काहीशी गटबाजी सुरू राहिली. त्यास आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी रणनीतीची छटा होती. असे असतानाच बंड करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वकीय ३२ आमदारांच्या साथीने सत्तेतील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदे मिळविली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेससह घड्याळ चिन्हावर हक्क दर्शविला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातून अजित पावर यांच्या बाजूने कोण आणि शरद पवार यांना कुणाची साथ आहे, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यावर मुंबईत या दोन नेत्यांच्या स्वतंत्र झालेल्या मेळाव्यातून पडदा पडला आहे. असे असले तरी अजित पवार आणि शरद पवार यांच्या गोटात गेलेल्या जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुढे अनेक आव्हांना सामोरे जावे लागणार आहे. ते कसे पेलले जाते त्यासाठी पुढील घडामोडी पाहणे उचित ठरेल.

शरद पवार गटात आहे कोण?

जिल्ह्यातून नेते शरद पवार यांच्या गटात प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, ज्येष्ठ जोसेफ मलबारी, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे, युवा प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, संजवनी गांगुर्डे आदींचा समावेश आहे. मुंबईतील पवार यांच्या मेळाव्यात जिल्ह्यातून दीडशेहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले, असा दावा श्री. भोसले यांनी केला.

अजित पवार यांच्या गटात कोण?

जिल्ह्यातून नेते अजित पवार यांच्या गटात जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर भामरे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, म्हाडाचे नाशिक विभागीय माजी अध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, तालुकाध्यक्ष विजय भामरे आदी. मुंबईतील पवार यांच्या मेळाव्यात साक्रीतील पक्षाचे पाच जिल्हा परिषद सदस्य, शिंदखेडा व साक्रीतील बहुसंख्य कार्यकर्ते आदी मिळून ३५० जण उपस्थित होते, असा दावा जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT