Newasa Nagar Panchayat 2025 Election : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी पंचायतीचे कॅप्टन, म्हणजेच नगराध्यक्षपदावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिलेदार असणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 जागांपैकी 10 जागांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. महायुती सहा, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा नगरपंचायत एकमेव पंचायत आहे. नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डाॅ. करणसिंह घुले विजयी झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीचा कॅप्टनपदी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून (Shivsena) घुले राहतील.
नगरपंचायतीच्या निवडणुकीला समोरे जाताना नेवाशात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची मशाल बाजूला सारली. त्यांचा जुना क्रांतिकारी शेतकरी पक्ष निवडणुकीत उतरवला. पक्षाने निवडणुकीत जोरदार बॅटिंग करत सर्वाधिक दहा जागांवर विजय मिळवला. महायुतीविरुद्ध शंकरराव गडाख, असा सामना निवडणुकीत पाहायला मिळाला.
नेवासे शहरात राज कोणाचे याकरीता विद्यमान आमदार विरुद्ध दोन माजी आमदार गटाने जीव तोडून रेटा लावला खरा मात्र प्रतिष्ठेच्या लढतीत शंकरराव गडाखांचा गट नगराध्यक्षपदाला गवसणी घालू शकला नसला तरी 'क्रांतिकारी' चे नऊ व युतीतील आम आदमीचा एक असे सर्वाधिक दहा नगरसेवक जिंकून आणले आहेत. आमदार विठ्ठल लंघे गटाचे नगराध्यक्षासह सहा नगरसेवक निवडून आले, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
विधानसभा निवडणुकीची हवा टिकून ठेवण्यात आमदार लंघेंना यश आल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला डाॅ. करणसिंह घुलेंच्या रुपाने कोरी पाटी व कामाची धडपड असलेला उमेदवार नगराध्यक्षपद करीता दिला, तिथेच अर्धी लढाई जिंकली होती.
नेवासा शहरात कुठलाही जथ्था अथवा नात्यागोत्याचे मोठे वलय नसताना घुले विजयी झाले, तर गडाख गटाकडून असलेले नंदकुमार पाटील पंचवीस वर्षांपासून सत्तेत व विजयी चेहरा असताना त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मुरकुटेंनी केलेला प्रयत्न तोंडघशी पाडणारा ठरला आहे.
गडाखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा क्रांतिकारी शेतकरी पक्षाची बॅट हातात घेतली, असताना त्यांचे सतरा पैकी दहा नगरसेवक निवडून आल्याने कामकाजात त्यांचे वजन राहील असे दिसते. माजी आमदार गडाखांनी सांगता सभा घेतली असती, तर चित्र वेगळे राहिले असते, असे बोलले जात आहे. आमदार लंघे यांनी सरकार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर असल्याने निधी कमी पडणार नसल्याचा केलेला प्रचार नगराध्यक्ष निवडून आणणारा ठरला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगता सभेत दिलेला शब्द मतदारांना प्रभावित करणारा ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.