Nashik News : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘महिन्यातील एक दिवस गडकिल्ल्यांसाठी’या उपक्रमांतर्गत महाविकास आघाडीचे नेते रविवारी (ता. २२) दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर पोहोचले आणि तेथील स्थितीचा आढावा घेतला.
या उपक्रमातून इतिहासाचे जतन होईल आणि मराठी माणसाला अभिमानाचे स्फूरण चढेल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्याचे कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. स्वराज्याच्या प्रेरणेने स्फूरलेल्या या ऐतिहासिक वास्तूची आपल्या हातून थोडी थोडकी सेवा घडली याचा आनंद असल्याचं पाटील म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दक्षिण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे खासदार राजाभाऊवाजे, आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ नेते औराम शेटे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवा नेते उदय सांगळे, नाना पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, पराग भगरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
रविवारी भर पावसात शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे हे सर्व मावळे या मोहिमेसाठी निघाले. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आपली वाहने थांबवून महाविकास आघाडीचे नेते पावसातच चालत किल्ल्याकडे निघाले. रामशेज किल्ल्यांवर पोहचले. पाच ते सहा फुट उंच शंभरपेक्षा अधिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सोलर दिवे, स्वागत कमान, स्वच्छता राखण्याचे सूचना फलक, कचराकुंडी, बसण्यासाठी बाकडे यावेळी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले. या उपक्रमात सूर्या अकादमीच्या युवकांनी देखील सहभाग नोंदविला.
किल्ला संवर्धनाच्या मोहिमेत गुंतले असताना अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने वातावरण भारून टाकले. पावसाच्या संततधारेत भिजतच सर्वांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. छत्री वापरायचा प्रयत्न केला, पण वाऱ्याचा जोर एवढा होता की काही क्षणातच छत्र्या उलटून पडू लागल्या. त्यामुळे अखेरीस पावसाचा आनंद घेतच रामशेज किल्ल्याची ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले की, इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे. या दिशेने खासदार नीलेश लंके यांनी हाती घेतलेला उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, असे मत त्यांनी व्यक्त करत, या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य आम्ही नक्कीच करू, अशी ग्वाही दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.