Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. यालाच ऑपरेशन टायगर असं संबोधण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या 'मातोश्री' निवासस्थानी 14 जूनला शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी या बैठकीसाठी आपल्या सर्व खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता कलियुग सुरु आहे, मात्र त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती अशा शब्दांत त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली आहे.
खासदार वाजेंनी आपल्यालाही बैठकीचा निरोप आला असल्याचे सांगितले. परंतु मला असे वाटत नाही की 'ऑपरेशन टायगर'च्या निमित्ताने ही बैठक असेल असं ते म्हणाले. ही नेहमीप्रमाणे होणारी बैठक असून मलाही निरोप आला आहे. मी बैठकीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन टायगरमधील संभाव्य खासदारांच्या यादीत आपलेही नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता खासदार वाजे म्हणाले, मी यापूर्वीही सांगितले आहे, पुन्हा सांगतो माझ्यापर्यंत कोणाचा निरोप आलेला नाही किंवा माझ्यापर्यंत देखील कोणी आले नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे आमची विश्वासार्हता संपत चाललीय अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
मी त्रेता युगात असतो तर मी छाती फाडून दाखवली असती, मात्र हे युग कलियुग असल्याने मला छाती फाडून दाखवता येत नाही. मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. शिवसेनेमुळेच मी विधानसभा व लोकसभेचा सदस्य झालो. त्यामुळे मी कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संशय घेण्याचे काहीही कारण नाही, मी कुठेही जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं त्यांनी ठाम सांगितलं.
विरोधी खासदार असल्याने विकासकामांमध्ये अडचणी येत आहेत, त्यातूनच असा निर्णय घ्यावा लागतोय या चर्चांवर विचारलं असता, खासदार वाजे म्हणाले, विकासकामे ही शासनाच्या निधीतून होतात, कुणीही वैयक्तिकरीत्या ती करत नाहीत. कामे आज होतील, उद्या होणार नाहीत, या गोष्टी सुरूच राहतील. परंतु, आपली विचारधारा बदलून काही करणे योग्य नाही. लोकांनी आपल्याला एका विचारधारेसाठी मतदान केलेले आहे. आपण लोकांची भावना लक्षात घेऊन आपण जिथे आहोत तिथेच राहिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.