Pankaja Munde-Monika rajale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी नगरमधील ‘मावशी’ बीडच्या मैदानात उतरणार

Pradeep Pendhare

Nagar News : बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे यांचा यानिमित्ताने राजकीय वनवास संपणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच, पाथर्डीमध्ये जल्लोष झाला. पंकजा या परळीला आई, तर पाथर्डीला मावशी समजतात. आईपेक्षा मावशीकडून जास्त माया मिळते, असे पाथर्डीविषयी पंकजा यांचे प्रेम आहे. हाच धागा पकडत पाथर्डी-शेवगावच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. तशी ही आपली जबाबदारीच आहे, असे आमदार राजळे यांनी म्हटले आहे.

पाथर्डी-शेवगाववर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे विशेष प्रेम आहे. हे प्रेम लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचे आहे. गोपीनाथ मुंडे यांचा हाच वारसा पुढे पंकजा मुंडे यांनी जपला आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी-बीडमधील आष्टीच्या सीमेवर भगवानबाबा गड आहे. या धार्मिक शक्तिस्थळामुळे मुंडे परिवाराचे बीडसह नगर जिल्ह्यातील पाथर्डीवर (Pathardi ) नेहमीच प्रेम राहिले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा २०१९ मध्ये त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून परळी मतदारसंघातून पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या पराभवानंतर पंकजा मुंडे राजकीयदृष्ट्या काहीशा खचल्या होत्या. पक्षाकडूनही त्यांना काहीसे दूर ठेवले गेले. असे असले, तरी पक्ष देईल, ती जबाबदारी पार पडत होत्या. मध्यंतरी पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांनी पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

पंकजा मुंडे या लढवय्या नेत्या. पक्ष पुढे संधी देत नाही, म्हणून त्या नाराज दिसत होत्या. तशी चर्चादेखील होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलण्यात आल्याची भावना होती. या राजकीय संभ्रमावस्थेमुळे पंकजा या काही दिवस सुटीवरही गेल्या होत्या. याच दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याकडे महाविकास आघाडीत आणि आता महायुती सरकारमध्ये मंत्रिपद कायम राहिले. बीडमध्ये धनंजय मुंडे आपली ताकद वाढवत असताना पंकजा मुंडे मात्र अस्वस्थ होत्या. राजकीय विचारधारा वेगळ्या असल्यातरी मुंडे बहिणी-भाऊ नाते जुळवून घेतले.

बहीण-भावाचे सूर जुळले

धनंजय मुंडे महायुतीत आल्यानंतर मुंडे बहीण-भावाचे सूर अधिकच जुळले. यातून पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार, पण करायचे कसे हा प्रश्न कायम होता. हाच तिढा सोडवताना पंकजा यांना भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांचीच बहीण पंकजा यांना ही उमेदवारी दिली गेली. पंकजा यांना उमेदवारीची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

आईपेक्षा मावशीची माया जास्त असते

पंकजा यांचे पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघावर विशेष प्रेम आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या पाथर्डीत हमखास प्रचार सभा घेतात. 'परळी ही माझी आई आहे, तर पाथर्डी ही माझी मावशी. आईपेक्षा मावशीची माया जास्त असते. कितीही त्रास झाला आणि संघर्ष करावा लागला, तरी पाथर्डीशी माझे विश्वासाचे नाते आहे', असे पंकजा यांचे पाथर्डीविषयी प्रेम आहे. हाच धागा पकडून पाथर्डी-शेवगाव भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये जाण्याचा निर्धार केला आहे. तशी आमदार राजळे यांनी पाथर्डी-शेवगावमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हाक दिली आहे.

‘पंकजांच्या प्रचारासाठी जाणे आपली जबाबदारीच’

'नगर दक्षिणमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करताना आपल्याला बीडमध्ये पंकजा यांच्या प्रचारासाठी जायचे आहे. तशी ही आपली जबाबदारीच आहे', असे आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे. सध्या पाथर्डी भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. भाजपचे निष्ठावान, जुने कार्यकर्ते एका बाजूला दिसत आहेत. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांच्या या आवाहनाला पाथर्डीमधून भाजप कार्यकर्ते किती प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT