Nashik News : अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकांवरील अत्यंत कठोर तरतुदी केंद्र शासनाने केल्या आहेत. त्याचे पडसाद देशभरात उमटले ट्रक आणि टँकर चालकांनी पुरवठा रोखत थेट केंद्र शासनाचेच नाक दाबले आहे. दरम्यान, आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील नाशिकला येत आहेत.
इंधन बंदच्या पार्श्वभूमीवर ते प्रशासनाशी चर्चा करून पेट्रोल पंप सुरळीत करण्यासाठी सूचना व चर्चा करणार आहेत, असे समजले आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे - पाटील (Radhakrishna Vikhe - Patil) आज काही तोडगा काढणार की काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे. पानेवाडी, मनमाड येथून चार पेट्रोलियम कंपन्यांचा विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांना इंधनपुरवठा होतो. या टँकर चालकांनी काल सायंकाळपासून बंद पुकारला आहे.
येथे 1 हजार 470 टँकर थांबले आहेत. त्यामुळे नाशिक (Nashik) सह राज्यातील 14 जिल्ह्यांचा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद झाला आहे. अपघातात कारणीभूत चालकास 7 लाखाचा दंड आणि 10 वर्षे तुरुंगवास अशी तरतूद असलेला वाहन अपघात कायदा केंद्रातील सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे वाहन चालक वाहतूक संस्था आणि संबंधित घटकांनी त्याचा मोठा धसका घेतला त्याचे परिणाम कालपासून राज्यभर दिसत आहेत.
सोमवारी सायंकाळी पानेवाडी येथे टँकर चालकांनी बंदचे आवाहन करत पानेवाडी रस्ता बंद केला. यावेळी भारत पेट्रोलियमसह चार अन्य इंधन कंपन्यांचा पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे प्रामुख्याने मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यांना होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कालपासून बंद झाला आहे. त्याचा परिणाम विविध पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दीत झाला. याबाबत आंदोलकांनी केंद्र शासनावर तिखट शब्दात टीका केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक शहर आणि जिल्ह्यात 220 पेट्रोल पंपांवर काल प्रचंड गर्दी झाली. इंधन भरण्यासाठी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यातील बहुतांशी पेट्रोल पंपांचे इंधन काल रात्री किमान पातळीला आले. त्यामुळे आज अनेक पेट्रोल पंप बंद होण्याची शक्यता आहे. टँकर आणि ट्रक चालकांच्या या संपाने प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यांनी तातडीची बैठक बोलविली आहे.
पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याला कितपत यश येईल याची शाश्वती नाही. संपाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे - पाटील आज सकाळी नाशिकला येत आहेत. वाहतूक संघटना तसेच प्रशासनाशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग निघणार का याची नागरिकांना उत्सुकता आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.