raj thackeray bjp sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mns News : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची डोकेदुखी, नेमकं कारण काय?

MNS Vs BJP Politics : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत वाटाघाटी होत असताना ठाकरेंनी महायुतीविषयी कोणतंही विधान केलं नाही, पण...

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Mns ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं नुकताच नाशिकचा दौरा केला होता. राज ठाकरेंच्या या नाशिक दौऱ्यानं लोकसभा निवडणुकीबाबत कोणतंही स्पष्टीकरण झालं नाही. पण, भाजपची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार, याची मोठी उत्सुकता राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) नुकताच नाशिक दौऱा केला होता. या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांची ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीऐवजी पक्षातील गटबाजीची चर्चा जास्त झाली. ठाकरेंनी कार्यकर्त्यांना गटबाजी संपवा आणि कामाला लागा, असा सज्ज इशाराच देऊन टाकला. यावेळी ठाकरेंनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

राज ठाकरेंच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी व्यक्तिशः देखील चर्चा केली. आगामी राजकीय धोरणाची यावेळी चाचणी करण्यात आली. पण, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत ठाकरेंनी दिले नाहीत. त्यामुळे खरे तर कार्यकर्त्यांची निरशाच झाली.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाबाबत वाटाघाटी होत आहेत. अशा स्थितीत ठाकरेंनी महायुतीविषयी कोणतंही विधान केले नाही. पण, महाविकास आघाडीच्या गोंधळाबाबत त्यांनी टोमणा मारला. त्यामुळे एकंदरच मनसे लोकसभेबाबत ऐनवेळी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मनसेची लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही. मात्र, राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर पक्षातील इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे माजी शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच ते मतदारसंघात दौरे सुरू करणार आहेत. त्यामुळं राज ठाकरेंच्या दौऱ्यानं लोकसभेऐवजी विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. ही तयारी भाजपला निश्चितच डोकेदुखी वाढविणारी ठरेल.

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या तिन्ही जागा भाजपने जिंकल्या. आजच्या स्थितीत मनसेला भाजपचा अदृश्य मित्र मानले जाते. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मनसेची भाजपला मदत होऊ शकली असती. आता मनसेच्या इच्छुकांनी थेट तयारी सुरू केल्याने, भाजपच्या आमदारांना त्याची झळ बसेल. एकंदरच राज ठाकरेंचा दौरा नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.

Edited By : Akshay Sabale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT