Ahmednagar news : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी इथे बेमुदत उपोषण आंदोलनास बसले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यशवंत सेनेचे हे दुसऱ्या टप्यातील आंदोलन 17 नोव्हेंबर पासून सुरू झाले असून आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी उपोषणस्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शासन धनगर आरक्षणाचा निर्णय गांभीर्याने घेत असल्याचे सांगितले.
धनगर आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी राम शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. याप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरु असून लवकरच ठोस निर्णय होणार असल्याचे सूतोवाच शिंदे यांनी यावेळी केले.
दरम्यान धनगर आरक्षण अमलबजावणीची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यापूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले. ते उपोषण थांबविताना महाराष्ट्र सरकारने ५० दिवसांत अमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही,त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली.उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले आणि सुरेश बंडगर यांनी आज राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्याचे सांगितले. तर शिंदे यांनी धनगर आरक्षण अमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर तातडीने हालचाली सुरु असून लवकरच सकारात्मक कृती झालेली दिसेल अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील,प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मिडीयाप्रमुख स्वप्निल मेमाणे समाधान पाटील,किरण धालपे,दत्ता काळे,संतोष कोल्हे,बाळा गायके, आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
सरकार वेळोवेळी केवळ आश्वासन देते. आश्वासन देतेवेळी समित्या स्थापन करू, अभ्यास करू, दौरे करू, असे सांगते. वेळेच्या अवधीत आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल असं सांगितलं जाते. मात्र शासनाने धनगर समाजाला ५० दिवसांच्या अवधीत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला जाईल हे लेखी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे आता जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी निर्णय घेतल्याचा अध्यादेश घेऊन चौंडीत येत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन थांबणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.