Sadabhau Khot, Ajit Nawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sadabhau Khot : सदाभाऊंचा सरकारला घरचा आहेर; 'या' निर्णयाची होळीच केली !

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : शासनाने दुधाचे किमान दर 34 रुपये ठरवलेले असताना खासगी कंपन्या आणि शासकीय दूध संघ हे सध्या 26 ते 27 रुपये भाव देत आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या फसवणुकीविरोधात रयत क्रांती मोर्चा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आदी संघटनांसोबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत मंगळवारी बैठक झाली. यात कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने ती निष्फळ ठरली.

यानंतर नाराज झालेले माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि दूध उत्पादक संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले आदींनी शासन अध्यादेश निर्णयाची सह्याद्री अतिथी गृहाबाहेरच होळी केली. तसेच राज्यस्तरीय आंदोलन घोषित करून महायुती सरकारला घरचा आहेर दिला.

गाईच्या दुधाला 3.5/8.5 गुणप्रतिसाठी प्रतिलीटर 34 रुपये दर देण्याचे आदेश जारी केले होते. यास खासगी कंपन्या आणि शासकीय दूध संघांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परिणामी सरकारविरोधात दूधउत्पादकांत नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आदी संघटनांनी राज्यभर आंदोलन पुकारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडवणीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले सदाभाऊंनी दिवाळी पाडव्याला थेट मंत्री विखे यांच्या घरासमोर खर्डा-भाकरी खाऊन आंदोलनाची घोषणा केली होती. त्यावेळी विखेंनी आंदोलन न करण्याचे आवाहन करत नगरमध्ये शेतकरी प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्यानंतर मुंबई येथे राज्यातील खासगी दूध कंपन्या शासकीय दूध संघ आणि शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध संघटना यांच्यासोबत बैठकीची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला दुग्ध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, खासगी दूध कंपन्यांचे आणि शासकीय दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री सदाभाऊ खोत, डॉ.अजित नवले आदी नेते होते.

यावेळी सदाभाऊ खोत, अजित नवले आदी नेत्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. दूध कंपन्यांच्या विरोधात शासन हतबल असल्याचा आरोपही केला. परिणामी कुठलाही ठोस निर्णय बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला नाही. त्यामुळे शासन निर्णय अध्यादेशाची होळी सह्याद्री अतिथी ग्राहक बाहेरच केली, असे डॉ. नवले यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी संघटनेचे सर्वच नेते शासनाच्या बोटचेपे धोरणाविरोधात आक्रमक झालेले दिसून आले. शासनाच्या निर्णयाविरोधात येत्या 24 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक खाजगी आणि शासकीय दूध कंपन्या आणि संघासमोर शेतकरी संघटना शासन निर्णयाची होळी करेल, असे घोषित करण्यात आले आहे. एकूणच दूध दरप्रश्नी झालेली मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबतची बैठक निष्फळ झाल्याने शेतकरी संघटन आक्रमक होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT