sadabhau khot Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Milk Price Protest : मंत्री विखेंच्या घरासमोर आंदोलन करण्यापूर्वीच सदाभाऊंना आला खास मेसेज!

Sadabhau Khot Protest Radhakrishna Vikhe Patil Residence : सदाभाऊ खोत आज नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवसस्थाना समोर आंदोलन करणार आहेत...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Politics : दूध आणि पशुधन सुरक्षा प्रश्नी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत आज महसूल आणि पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवसस्थाना समोर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खर्डा भाकरी खाऊन आंदोलन करणार आहेत. दुधाचे पडलेले दर, लम्पि आजारात शासनाची मदत आणि पशुधनाबाबतच्या उपाययोजना आदी विषय मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभागाकडे असल्याने सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनाला महत्त्व आहे.

गाईच्या 3/5, 8/5साठी 45 रुपये दर मिळावा, पशु खाद्य दरावर सरकारचे नियंत्रण असावे, पशुखाद्य दर 50 टक्क्याने कमी करावेत, दूध भेसळ विरोधात धडक पथके तयार करावीत, जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करण्यात यावी, दूध दर मूल्य आयोग तयार करण्यात यावा व त्याला कायदेशीर मान्यता असावी, दूध दराला एफआरपीचे कायदेशीर कवच मिळावे, प्रत्येक गावामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करून मिळावी, दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या रयत क्रांती संघटनेच्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदाभाऊ खोत आंदोलन करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री असल्याने राधाकृष्ण विखे यांच्या लोणी इथल्या निवासस्थाना समोर दुपारी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जवळच असलेल्या कोल्हार गावात सकाळपासूनच जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने खोत मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सदाभाऊ खोत हे फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेले आहेत. मात्र शेतकरी, दूध, पशुधन आदी प्रश्नांवर त्यांनी विद्यमान महायुती सरकार विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली आहे.

दरम्यान, खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री राधाकृष्ण विखे हे आज नगर शहरात कार्यक्रमानुसार येत असून त्यांच्या वतीने सदाभाऊ खोत यांना आंदोलन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलन करण्याऐवजी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू, असा निरोप खोत यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता खोत हे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चर्चेला येतात की ठरल्या प्रमाणे लोणी इथे विखे यांच्या निवासस्थाना समोर खर्डा भाकरी खाऊन आंदोलन करतात हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT