Nagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा महापालिका आयुक्तांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाविरोधात समाजवादी पक्ष आक्रमक झाला आहे. नामांतराच्या प्रस्तावाला विरोध करताना केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांकडे समाजवादी पक्षाने लक्ष वेधले आहे. यामुळे अहमदनगर शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर एेन लोकसभा निवडणुकीत राजकारण पेटणार असे दिसते आहे.
समाजवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाने निवेदन देत नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. ५३४ वर्षांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक नगर शहराचे नामांतर करू नये. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्गाने वेगवेगळे आंदोलन उभारण्याचा आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाईचा इशारा समाजवादी पक्षाने निवेदनातून दिला आहे.
नगर शहराची स्थापना २८ मे १४९० मध्ये झाली. नगर शहर व जिल्ह्याला ५३४ वर्षांचा प्रदीर्घ, असा इतिहास आहे. नगर शहर जगात सर्वत्र प्रसिद्ध असून, त्याचा क्षणातच बेकायदेशीरित्या घाईघाईने नामांतराचा प्रस्ताव महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या महापालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून घेतला. हा प्रस्ताव जनमतातून घेतल्यास काय परिस्थिती आहे, याची जाणीव होईल. महापालिका आयुक्तांनी नामांतराचा सादर केलेला प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महापालिका आयुक्तांनी कोणाला खूष करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली हा ठराव पारित केला हे न उलगडणारा प्रश्न आहे. यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर संशय उपस्थित करत समाजवादी पक्षाने निर्णयाचा निषेध केला. आरक्षणाची वचनपूर्ती करू न शकल्याने एका समाजाची नाराजी दूर करण्यासाठी, असे उपटसुंभ निर्णय जनतेवर लादले जात आहेत.
खरे तर त्या समाजाला नामांतराचे गाजर दाखविण्यापेक्षा सरकारने संबंधित समाजाची अनेक वर्षांची प्रलंबित मागणीची पूर्तता करावी. तसेच नामांतराच्या केंद्राच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. याकडेदेखील अबीद हुसैन यांनी लक्ष वेधले. यात प्रामुख्याने "शहाराच्या नावाला काही ऐतिहासिक वारसा असेल तर त्या ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही," अशी स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करत महापालिका आयुक्तांनी घाईघाईने बेकायदेशीर प्रस्ताव पाठविल्याचा आक्षेप आबीद हुसैन यांनी घेतला आहे. नगर या नावाला आतापर्यंत शहराचे आमदार, खासदार तसेच स्थानिक राजकीय पक्ष तसेच कोणत्याही नगरसेवकांचा विरोध नाही. तरीदेखील नामांतराचा विषय रेटला जात आहे. यात राजकीय हेतू दडला आहे.
तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान व आदर आहे. त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे. परंतु ५३४ वर्षांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक नगर शहराचे नामांतर करू नये, असेदेखील समाजवादी पक्षाचे आबीद हुसैन यांनी म्हटले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.