Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena convention : ठाकरे गटाच्या शिवसेना अधिवेशनावरुन राऊतांचे भाजपला आव्हान...

संपत देवगिरे : सरकारनामा

Shivsena convention : हिंदुत्व हे आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. येत्या मंगळवारी होणारे अधिवेशन हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचे अधिवेशन असेल हे आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दि. 22 रोजी नाशिकला येत आहेत.

पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि उद्धव ठाकरे यांची सभा यासंदर्भात आढावा घेण्यासाठी राऊत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओझर विमानतळावर आल्यावर थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी भगूरला जातील. तेथे लोकांशी संवाद साधतील.

सायंकाळी काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजन करतील. त्यानंतर ते रामकुंडावर जाऊन गोदावरीची आरती करतील. मंगळवारी पक्षाचे अधिवेशन असून त्यानंतर सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर पक्षप्रमुख ठाकरे यांची सभा होईल. यावेळी पुन्हा एकदा 'दार उघड, बये दार उघड' असे आवाहन करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस देखील असल्याने तो आम्ही अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, लोक विचारतात की तुमचा अयोध्येशी संबंध काय ? यावेळी भाजपच्या लोकांना आपल्या इतिहासाचे विस्मरण झाल्याचे जाणवते. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली त्याची जबाबदारी भाजपवाल्यांनी टाळली होती.

त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती जबाबदारी घेतली होती, हे त्यांनी विसरू नये. अयोध्येत शरयू नदीच्या तिरी आरतीची सुरुवात शिवसेनेने केली आहे. हा राष्ट्रीय सोहळा आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देखील रीतसर आमंत्रण दिले पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सोरटी सोमनाथाचे मंदिर बांधण्यात आले तेव्हा राष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले होते याचा भाजपला विसर पडलेला दिसतो असा टोमणा राऊत यांनी मारला.

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा याबाबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कामाला लागले आहेत. गावोगावी बैठका घेऊन याबाबत माहिती देण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात याविषयी अत्यंत उत्साहाचे वातावरण असल्याने ठाकरे यांच्या सभेकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT