Nagar Loksabha News : विखे पिता-पुत्र माझ्यावर व बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करतात. परंतु आम्ही दोघांनी बाळासाहेब विखे यांना मदत केली होती, हे मात्र विसरतात. विखे परिवारात माणुसकीच नाही, असा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केला. दरम्यान, नीलेश लंके यांना मी लोकसभेची उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्री विखे यांनी माझ्याकडे मुंबईतील एका उद्योगपतीला पाठवले होते, असा गौप्यस्फोटही पवार यांनी या वेळी केला. (Nagar Loksabha Election 2024)
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर शहरातील गांधी मैदानात झाला.
या वेळी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, सेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, नगरचे माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांसह नेतेमंडळी उपस्थित होते.
शरद पवार यांनी विखेंवर जोरदार टीका केली. विखे माझ्यावर व बाळासाहेब थोरात यांच्यावर नेहमी बोलतात. परंतु त्यांच्या परिवाराच्या सार्वजनिक जीवनात आमची काही ना काही मदत त्यांना नक्कीच झालेली आहे. बाळासाहेब विखे खासदारकीला उभे असताना मी त्यावेळी मुख्यमंत्री होतो. भाऊसाहेब थोरात मदत करतील, अशी बाळासाहेब विखे यांना खात्री नव्हती. त्यावेळी मी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रात्री एकपर्यंत माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर हा प्रश्न माझ्यासमोर आला. त्यावेळी मी तातडीने बाळासाहेब विखे यांना माझ्या गाडीत बसवले आणि आम्ही जोर्वेला गेलो.
भाऊसाहेब थोरात यांची रात्री तीन वाजता भेट घेतली. भाऊसाहेबांना आम्ही झोपेतून उठवले. त्यावेळी बाळासाहेब विखेंनी अंत:करणपूर्वक त्यांची माफी मागितली आणि थोरात यांनीही त्यांना माफ केले. विजयी केले आणि त्यांचा लोकसभेचा मार्ग खुला केला. तरीही विखे आमच्यावर टीका करतात, याचा अर्थ त्यांच्यात माणुसकी नाही, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, ते आधी काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. तेथून पुन्हा काँग्रेस विरोधी पक्षनेते झाले. मग भाजप व तेथे मंत्री झाले. याचा अर्थ त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नाही, असा दावाही पवारांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत तीन आठवड्यांपूर्वी एक उद्योजक माझ्याकडे आला व महसूलमंत्र्यांची विनंती असल्याचे सांगू लागला. मी म्हटले तुमचा व महसूलमंत्र्यांचा संबंध काय तर तो म्हणाला, असे संबंध जपावे लागतात. त्यावेळी तो म्हणाला, "काहीही करा पण पवारसाहेबांना सांगा नीलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या. जो माणूस कधी माझ्या दारात आला नाही, तो माणूस एकाला माझ्याकडे पाठवतो हे विशेष म्हटले पाहिजे". त्यामुळे तुमच्याकडे सत्ता व साधने असली तरी माणुसकी व सामान्यांचे प्रेम हाच लंके यांचा खजिना आहे, असे गौरवाेद्गार पवार यांनी काढले.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शेतकरी व पाण्याच्या प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांना आस्था नाही. लोकशाही व संविधान याबद्दल चुकीचा विचार या राज्यकर्त्यांच्या मनात आहे. देशाची घटना दुरुस्त करण्यासाठी मोदींना अधिकार हवा आहे, असे बंगळुरूचे भाजपचे नेते हेगडे हेच जाहीरपणे सांगतात. त्यामुळेच यांना पुन्हा सत्ता दिली तर ते तिचा गैरवापर करतील, असा दावाही पवार यांनी केला. दरम्यान, नगरमध्ये व्यापारी व उद्योजकांमध्ये दहशत आहे. महाविकासचे उमेदवार लंके येथील व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी व बाळासाहेब थोरात जबाबदारी घेत आहोत, असेही पवारांनी जाहीर केले.
शरद पवार यांनी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांचे विशेष कौतुक केले. लंके दाम्पत्यांचा लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्या दोघांना देण्यासाठी मी फुले आणली होती. परंतु नीलेश लंके यांनी दुसऱ्यांना सारे काही देण्याच्या स्वभावामुळे ती फुले लोकांना देऊन टाकली. कोविड काळात लंके यांनी केलेले काम त्यांना महाराष्ट्राचा हिरा करून गेले. त्यामुळे विवाह वाढदिवसानिमित्त मी या दोघांचे विशेष अभिनंदन करतो आणि असा नवरा सांभाळल्याबद्दल राणी लंकेचे विशेष कौतुक करतो, असे पवार म्हणताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.