Shirdi Lok Sabha Constituency  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डीमधून खासदार सदाशिव लोखंडेंच्या हॅटट्रिकमध्ये जागावाटपाचा अडसर

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : सदाशिव किसन लोखंडे हे शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेले लोखंडे यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या लोखंडेंचा राजकीय प्रवास रंजक आहे. विशेषत: त्यांना खासदारकीची उमेदवारी ही एक प्रकारची लॉटरीच समजली जाते. सदाशिव लोखंडे हे सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेत असून, आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी तिसरी आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. (Shirdi Lok Sabha Constituency)

मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या सदाशिव लोखंडे यांनी राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली होती. ते भाजप पक्ष संघटनेत विविध पदांवर कार्यरत असताना 1995 च्या निवडणुकीत त्यांना अहमदनगर दक्षिणमधील कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी या मतदारसंघाची आमदारकी भूषवली.

दरम्यान, 2009 मध्ये हा मतदारसंघ खुला झाला. सत्तेची चटक लागल्याने लोखंडे यांनी संघ विचारसरणीला बाजूला सारत मनसेमध्ये प्रवेश केला आणि कुर्ला मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, तेथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा त्यांनी भाजपध्ये प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 मध्ये त्यांनी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि मोदी लाटेत ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यावेळी शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी आयत्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने लोखंडे यांनी संधी ओळखून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना खासदारकीची लॉटरी लागली. पुढे 2019 च्या निवडणुकीतही त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली, या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून खासदारकी कायम ठेवण्यात यश मिळवले.

दरम्यान, 2022 मध्ये शिवसेना फुटीनंतर पक्षनिष्ठेशी कसलाही संबंध नसलेल्या लोखंडे यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून लोखंडे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यःस्थितीत शिर्डी मतदारसंघातील मतदार लोखंडे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांच्या उमेदवारीचा आणि विजयाचा मार्ग खडतर असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

अनुसूचित जाती -जमातीसाठी राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनेक मातब्बर राजकीय नेत्यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सद्यःस्थितीत पक्षीय बलाबल पाहता या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचा एकही आमदार नाही. त्यामुळे विखेंचा गड समजला जाणारा हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

नाव (Name)

सदाशिव किसन लोखंडे

जन्मतारीख (Birth date)

01 जून 1962

शिक्षण (Education)

दहावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

सदाशिव लोखंडे हे शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. सदाशिव लोखंडे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील दिघोर या गावात झाला. पुढे लोखंडे यांचे वडील किसन शांताराम लोखंडे रोजगारानिमित्त कुटंबासह मुंबईतील चेंबूर भागात स्थलांतरित झाले होते. सदाशिव लोखंडे यांच्या मातोश्रींचे नाव केराबाई लोखंडे असे होते. त्या चेंबूर भागात भाजीपाला विकण्याचे काम करत होत्या. अशा गरिबीच्या परिस्थितीतून आलेल्या सदाशिव लोखंडे यांनी राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सदाशिव लोखंडे यांच्या पत्नीचे नाव नंदा लोखंडे असे असून, या दाम्पत्यास 3 मुले, एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

शिर्डी

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सक्रिय असणारे सदाशिव लोखंडे यांच्यावर प्रमोद महाजन यांचा प्रभाव होता. महाजन यांनीही लोखंडे यांना पक्षात विविध पदांवर संधी दिली होती. मुंबईत वास्तव्याला असताना त्यांना भाजपने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातून दिली. 1995 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 ला ते याच मतदारसंघातून आमदार झाले. 2009 ला हा मतदारसंघ खुला झाला. त्यावेळी भाजपने उमेदवारी नाकारल्यावर सदाशिव लोखंडे यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेने त्यांना कु्र्ला मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, या वेळी लोखंडे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना अवघी 33,967 मते मिळाली होती.

या पराभवानंतर लोखंडे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पुढील निवडणुकीपर्यंत लोखंडेंना संधी मिळणार नव्हती. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेवर दुसरा उमेदवार शोधायची वेळ आली. त्यातच शिवसेनेने तत्कालीन आमदार बबनराव घोलप यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ते अपात्र ठरणार होते. हीच संधी साधून निवडणुकीला जेमतेम 16-17 दिवस राहिले असताना लोखंडेंनी पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनेही त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीवेळी मोदी लाटेत सदाशिव लोखंडे यांचाही विजय झाला.

2014 च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा पायावर दगड मारून घेणारा निर्णय लोखंडे यांच्यासाठी फायद्याचा ठरला. लोखंडे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना 5,32,936, तर काँग्रेसमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वाकचौरे यांना 3,33,014 मते मिळाली. खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये लोखंडे यांनी संधीचे सोने करत मतदारसंघात विकासाची कामे केली. याचा फायदा पुढे 2019 च्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीतही लोखंडे विजयी झाले. या वेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. खासदारकीच्या काळात लोखंडे यांनी शिर्डी मतदारसंघातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला.

दरम्यान, 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर लोखंडे यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी स्थानिक शिवसैनिक लोखंडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार लोखंडे हे तब्बल एक महिन्यानंतर शिर्डीत दाखल झाले. त्यावेळी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी संरक्षण दिले होते. त्यामुळे लोखंडे यांच्या विरोधातील मूळ शिवसैनिकांच्या रागाचा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांना बसू शकतो. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, यावर लोखंडे यांच्या खासदारकीच्या हॅटट्रिकचे भविष्य ठरणार आहे. हा मतदारसंघ भाजप स्वत:कडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असले तरी लोखंडे यांच्या खासदारकीची हॅटट्रिक करण्याचा शब्द नगर दक्षणिचे खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात लोखंडे यांचे भवितव्य काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधीतून बरीचशी विकासकामे केली आहेत. गाव-खेड्यांना रस्त्यासाठी निधी, समाजमंदिर अशी विकासकामे त्यांनी केली आहेत. यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. त्यांनी निळवंडे धरणाचे पाणी मतदारसंघात आणले आहे. घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी लोखंडे यांनी प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी वारंवार संसदेत आवाज उठवला आहे. कोरोना काळात त्यांनी कोरोना योद्ध्यांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली होती. आरोग्य केंद्रामध्ये पीपीई किट, सॅनिटायझरसह औषधे, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात लोखंडे यांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. त्यांच्या या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

या निवडणुकीत लोखंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने दुसऱ्यांदा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव शिर्डी मतदासंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये लोखंडे यांनी भाऊसाहेब कांबळे यांचा 1,20,195 मतांनी पराभव केला होता. लोखंडे यांना एकूण 4,83,449 मते मिळाली होती,तर कांबळे यांना 3,64,113 मते मिळाली होती.

त्यावेळी मतदारसंघात त्यांच्याबद्दल जनसंपर्क न ठेवणारा प्रतिनिधी म्हणून वातावरणनिर्मिती झाली होती. मात्र, लोखंडे यांनी मतदारसंघात विकासकामे केली होती. याशिवाय लोखंडेंनी ही निवडणूक जिंकण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे विखे पाटील घराण्याचा भाजप प्रवेश होय. सुजय विखे यांनी भाजप प्रवेश करत नगर दक्षिणची उमेदवारी मिळवली होती. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर विखे पाटलांनी आपली सगळी ताकद युतीचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारात लावली. प्रवरा परिवार हा लोखंडेंसाठी झटताना दिसून आला. विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे थोरात विरुद्ध विखे असा हा प्रतिष्ठेचा सामना होता. विखेंना आपली ताकद दाखवून देण्याची संधी होती. ती त्यांनी दाखवून दिली आणि सदाशिव लोखंडे यांची दुसऱ्यांदा लॉटरी लागली.

दुसरीकडे. काँग्रेसने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती. थोरातांनीही कांबळेंना विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार केला होता. आघाडीचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले, मात्र त्याचा फायदा कांबळेंना झाला नाही. याचे कारण म्हणजे मोदी लाटेचा प्रभाव अद्याप ओसरला नव्हता. पुलवामा हल्ला प्रकरणाचे राजकीय भांडवल आणि विखेंचा भाजप प्रवेश यामुळे सदाशिव लोखंडे पुन्हा एकदा विजयी झाले होते.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

खासदार लोखंडे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा फारसा प्रभावी मानला जात नाही. लोखंडे हे मतदारसंघात जनतेमध्ये उतरून काम करत नसल्याची टीका वारंवार केली जाते. मतदारसंघात खासदार वेळ देत नसल्याचा आरोपाला उत्तर देताना इतक्या मोठ्या मतदारसंघात कुठे कुठे वेळ देऊ, असे विधान त्यांनी केले होते. याशिवाय त्यांच्या यशाचे गमक म्हणून त्यांनी फारसे जनतेमध्ये राहायचे नाही, जनतेत राहिल्यास नाराजी वाढते, असा सल्लाही शिवाजीराव कर्डिले यांना दिला होता. लोखंडे यांचा जनसंपर्क प्रभावी नसल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजीही व्यक्त केली जाते.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सदाशिव लोखंडे हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय दिसून येत नाहीत. त्यांची सोशल मीडिया टीमदेखील कार्यरत नसल्याचे दिसून येते, https://www.facebook.com/Mpshirdiconstituency/

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

खासदार लोखंडे यांनी जानेवारी 2023 मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे करण्याची मागणी केली होती. यामध्ये नगर दक्षिणचे नाव अहिल्यानगर आणि नगर उत्तरचे साईनगर असे नामांतर करावे, यासह सोलापूर, बीड यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांचेही विभाजन करून सहा विधानसभा मतदारसंघांचा एक जिल्हा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. भाजपसोबत जाण्यासंदर्भात 15 खासदारांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती, असा गौप्यस्फोट लोखंडे यांनी केला होता. आरक्षणामुळे मी खासदार झालो, असेही विधान त्यांनी केले होते. आदित्य ठाकरे यांनी लोखंडे यांच्यावर शिंदे गटात गेल्यानंतर नालायक म्हणून टीका केली होती. त्यावेळी आम्ही जर नालायक असतो तर लोकांनी निवडून दिले नसते, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला होता. दुसरीकडे, शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला शेकडो कार्यकर्ते मुंबईला घेऊन गेलेले खासदार लोखंडे यांनी कार्यकर्त्यांच्या सुविधेवर बोलताना दारू- मटण नाही तर कार्यकर्त्यांना किमान ‌चटणी-भाकर, भाजी-भाकर तर मिळायला हवी, असे विधान केले होते.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru)

प्रमोद महाजन

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसला तरी मतदारसंघातील विकासकामे करत असताना ते राजकारण करत नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी राहते. याशिवाय आगामी निवडणुकीसाठीदेखील शिंदे गटात गेलेले खासदार लोखंडे यांच्याशिवाय या मतदारसंघात दुसरा कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा शिंदे गटास सुटल्यास लोखंडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे जर शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास महायुतीच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर लोखंडे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

खासदार सदाशिव लोकंडे हे मतदारसंघात जनसंपर्क ठेवत नसल्याची बाब त्यांच्याबाबत नकारात्मक मानली जाते. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबाबत नाराजी असल्याचेही बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महायुतीकडून जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जातो, यावर लोखंडे यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. याशिवाय शिर्डी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपकडून ही जागा शिंदे गटाला देण्यास विरोध आहे. रामदास आठवले यांनीही महायुतीमध्ये शिर्डी मतदारसंघाची मागणी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमधील दोन्ही जागांवर भाजपचा खासदार विजयी होईल, असे विधान व्यक्त केले आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

शिवेसना फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केलेले शिर्डीचे विद्ममान खासदार यांना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, महायुतीत शिर्डी मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिर्डी मतदारसंघ भाजपच्या किंवा आरपीआयकडे गेल्यास लोखंडे यांचा पत्ता आपोआप कट होऊ शकतो.

शिंदे गटातून उमेदवारी नाही मिळाल्यास लोखंडे यांना पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. याशिवाय त्यांच्या पक्ष बदलण्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे ते पक्ष बदलून भाजपकडून उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न करू शकतील, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. सद्यःस्थितीत जागावाटपानंतरच खासदार लोखंडे यांच्या हॅटट्रिकचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, या मतदारसंघात आगामी लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांची नावे समोर येत आहेत. काँग्रेसकडून गेली निवडणूक लढवलेले भाऊसाहेब कांबळे यांच्यासह उत्कर्षा रुपवते यांच्या नावांची चर्चा होत आहे. महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजपचे प्रवक्ते नितीन दिनकर यांची नावे पुढे येत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT