Sharad Pawar And Shiv Sena Thackeray Party Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar And Shiv Sena Thackeray Party : ठाकरेंच्या 'मशाली'ला पवारांच्या 'तुतारी'चं बळ? शरद पवारांच्या भेटीत काय घडलं...

Shiv Sena Thackeray party office bearers met Sharad Pawar in Nagar city : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतून नेमकी कोणाला? याची चर्चा असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कामाला लागा, अशा सूचना शरद पवारांनी केल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आले आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत नेमकी कोणाला, याचा फैसला झालेला नाही. महाविकास आघाडीतील प्रत्येक पत्र ही जागा खेचण्याच्या तयारीत आहे. तशी ही जागा युतीमध्ये असताना शिवसेनेकडे होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर ही जागा कोणाकडे, असा प्रश्न आहे.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रबळ दावा समोर येत असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन, आशीर्वाद घेतले. त्यामुळे सध्या तरी शिवसेना ठाकरे पक्षाचा मार्ग सुकर झाला असला, तरी प्रत्यक्षात जागा वाटपात काय होते, हे बघण्यासारखे असणार आहे. नगरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर 'मशाली'ला राष्ट्रवादी पवार पक्षाच्या 'तुतारी'चं बळ मिळणार असे दिसते.

शरद पवार (Sharad Pawar) यांची पुणे येथील मोदी बागेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि मंदार मुळे यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे, शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील सद्य राजकीय स्थितीवर चर्चा झाली. विक्रम राठोड यांनी वस्तूस्थिती मांडली. तसंच नगर शहरातील राजकीय हालचाली मांडल्यानंतर, शरद पवार यांनी कामाला लागा, अशा सूचना केल्याचे विक्रम राठोड यांनी सांगितले.

"नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (Shiv Sena) दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी भरीव काम आहे. त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे न्या, मी आहेच तुमच्याबरोबर, नगर विधानसभेच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा सुरू आहे", असे शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. शरद पवार यांचे हे विधान म्हणजे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरमधील पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी आशीर्वाद आहेत, असे विक्रम राठोड, गिरीश जाधव यांनी म्हटले.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल शरद पवार यांनी माहिती जाणून घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव कार्य केलेले आहे. शिवसेनेची या मतदारसंघावर पकड आहे. राठोड परिवाराला नगरकरांनी कायम साथ दिली आहे. अनिल राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल. आपण शिवसेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. तुम्ही तयारीला लागा. 'शिवसेनेने पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जा', असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याचा दावा विक्रम राठोड यांनी केला.

खासदार शरद पवार यांच्या भेटीनंतर नगरची जागा निश्चितच शिवसेनेला सुटेल, असा आशावाद व्यक्त करत मागील निवडणुकीत अनिल भैय्यांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून डझनभर इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असले, याची चर्चा सध्या शिवसेनेत रंगली आहे. विरोधकांकडून देखील शिवसेना ठाकरे पक्षातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT