Agriculture Scam News : युरिया आणि अन्य रासायनिक खतांचा वापर औद्योगिक उपयोगासाठी देखील केला जातो. त्याचा गैरफायदा आणि नियमबाह्य वापर अनेक औद्योगिक संस्था करीत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ताटातला घास ओरबाडण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या जिल्हा असलेल्या नाशिकमध्येच एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. दिंडोरी येथील एका कंपनीकडून अनुदानित युरियाचा वापर औद्योगिक उपयोगासाठी करण्यात आल्याचे आढळले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे.
शेती वापराचा 90 मॅट्रिक टन युरिया खासगी कंपनीच्या घशात गेल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथील एका खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामशेज येथील गट नंबर 305/13 मध्ये असलेल्या पशुखाद्य बनविणाऱ्या एका खासगी कंपनीची तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे आवर सचिव चेतराम मीना व जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक देशमुख यांनी केली असता तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तावेज, साठा नोंदवही, खरेदी किंमत, युरिया दैनंदिन वापर नोंदवही, कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला.
त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने 50 किलो बॅगेतील युरियाची किंमत 24 ते 28 रुपये किलो असल्याचे लक्षात आले. युरियाची तपासणी केली असता टेक्निकल ग्रेड औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आले.
90 मॅट्रिक टन वजनाच्या 50 किलो वजनाच्या १८०० बॅगा किंमत 22 लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज सीलबंद करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे.
केंद्र शासनाकडून युरियाचा शेतीसाठी वापर अपेक्षित आहे. त्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र, वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटींचा गैरफायदा औद्योगिक संस्था घेत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. दिंडोरीचा प्रकार उघडकीस आल्याने राज्यभरात अन्य किती संस्था शेतकऱ्यांच्या वाट्याचा युरिया लाटतात हा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यासंदर्भात विरोधी पक्ष खडबडून जागा झाला आहे. त्यांनी यासंदर्भात राज्य शासनाच्या यंत्रणेतील त्रुटी केव्हा दूर होणार असा प्रश्न केला आहे. याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. याचा सखोल तपास करून संबंधितांवर गंभीर कारवाईची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.