MLA Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pachora News : अयोध्येच्या धर्तीवर पाचोऱ्यात श्रीराम मंदिर

Sampat Devgire

Shreeram temple Pachora News : हिवरा नदीकाठी असलेल्या प्राचीन राम मंदिर परिसराला आता पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत देखणे रूप प्राप्त होणार आहे. त्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मंदिर परिसर विकासाचा अंतिम आराखडयाला मंजूरी मिळाल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. (Shreeram temple plan sanctions by state Government)

मंदिराचा (Temple) अंतिम विकास आराखडा मंजूर झाला असून, येत्या जून महिन्यापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे. भाविक आणि पाचोरा (Jalgaon) शहरवासीयांनी त्याचे स्वागत केले आहे. अयोध्येच्या (Ayodhya) धर्तीवर हे मंदिर साकारले जाणार आहे. त्यासाठी आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी पाठपुरावा केला होता.

हिवरा नदीकाठी राम मंदिराचा परिसर आहे. या परिसरात राम मंदिरासह हनुमान मंदिर, महादेव मंदिर ,गोशाळा, व्यायाम शाळा व काही शेती आहे. हा परिसर भाविकांसाठी धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे.

मुख्यमंत्री होण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन पुरोहित गजानन जोशी यांच्या मंत्रोच्चारात काही विधी व ग्रहशांतीही केली होती. या ठिकाणी राम नवमी, हनुमान जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशीचे उत्सव साजरे होतात. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

या भव्य व धार्मिक परिसराचा विकास व्हावा, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी प्रस्ताव सादर करून निधीसाठी पाठपुरावा चालवला होता. त्या आधारे पर्यटन विकास योजनेंतर्गत राम मंदिर परिसर विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आणखी वाढीव निधीची अपेक्षा आहे.

अयोध्या येथील राम मंदिराच्या धर्तीवर येथे भव्य दिव्य मंदिर साकारणार असून, मंदिराच्या चारही बाजूला पाणी व विविध विधिसाठी घाट, नदीवर पूल, मंदिर परिसरात प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग, पूजा विधीची जागा, गोशाळा, बगीचा, बालकांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, खुली जिम, व्यायाम शाळा, प्रशस्त पार्किंग, लॉन व खुले सभागृह, हॉटेल, सर्व परिसरात फिरता येईल, असे प्रशस्त रस्ते अशा सर्व सुविधा साकारल्या जाणार आहेत.

परिसर विकासाचा आराखडा वास्तु विशारद सुजित वर्मा यांनी तयार केला असून, त्याचे अवलोकन करून आमदार किशोर पाटील यांनी त्यास मंजुरी दिली आहे. आमदार किशोर पाटील, सुजित वर्मा, अभियंता डी. एम. पाटील, एमएसपी ‘बिल्डकॉन’चे मनोज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी करून श्री. वर्मा यांनी केलेला आराखडा समजावून घेऊन त्यास तत्काळ मंजुरी दिली आहे. येत्या जून महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT