Nashik News : नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? हा विषय आता थंड झाला आहे. सुरुवातीला पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी तिन्ही घटक पक्षांमध्ये राजकीय चुरस होती. त्यातही हजारो कोटींचे बजेट असणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्री पदाला कमालीचे महत्व प्राप्त झाले होते. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे या तिघांनीही पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली होती. पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसे आणि कोकाटे यांच्या नाकावर टिच्चून सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून सर्व सूत्रे हाती घेतल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे महत्वही आता कमी झाल्यासारखाच आहे.
नाशिक जिल्ह्यात आजघडीला चार मंत्री आहेत. मात्र पालकमंत्री नाही. अशात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक पालकमंत्री पदाच्या घोषणेचे काय याची विचारणा झाली. त्यावर फडणवीस यांनी पालकमंत्रिपदामुळे काय अडलंय? असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वाक्याचा अर्थ खरंच आहे. नाशिकला पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. त्याने कोणतेही काम अडले नाही, असे चित्र आहे.
नाशिक कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापन झाले आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वात हे प्राधिकरण काम करत आहे. याशिवाय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची कुंभमेळा आयुक्त म्हणून नवीन पद निर्माण करून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा झाला तरी नोकरशाहीच्या माध्यमातून कुंभमेळ्याचे नियंत्रण थेट आपल्याकडेच राहील याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून येते.
याशिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री देखील आहे. याच विभागाकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोपविण्यात आला आहे. त्यामुळे महाजन हे आपोआपच सिंहस्थ कुंभमेळा मंत्री झाले आहेत. सध्या तरी नाशिकच्या अजेंड्यावर सिंहस्थ कुंभमेळा हा एकमेव मोठा विषय आहे. त्याचा कारभार मंत्र महाजन हाताळत आहेत. महाजन यांनी आता नाशिक दौऱ्याचा आणि नियोजन बैठकांचा धडाका लावला आहे. ते महायुतीच्या अन्य पक्ष व लोकप्रतिनिधी नाही फारसे भाव देताना दिसत नाहीत.
फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली त्यात इतर मंत्री मदत आणि मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. पण अधिकार महाजन यांच्याकडेच असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. त्यामुळे भुसे आणि कोकाटे यांच्याही हातात अधिकार नसल्यासारखेच आहे. याशिवाय आतापर्यंत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या झालेल्या सर्व बैठकांमध्ये एकदाही खासदारांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. नाशिक जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव असे तीन खासदार आहेत. या खासदारांना कुंभमेळ्यातून अलगद बाजूला करण्यात आले आहे.
राजकीय दृष्ट्या विचार केल्यास शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात जास्त आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी तेथील पालकमंत्री पदावर हक्क सांगितला होता. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 7 आमदार आहेत. त्यामुळे या पक्षाला पालकमंत्री पद हवे होते. याशिवाय तडजोड म्हणून शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देखील पालकमंत्री पदात रस होता. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये सुरू असलेली ही राजकीय चढावळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घेण्यात अडथळे निर्माण करीत होती.
त्यावर फडणवीस यांनी कौशल्याने तोडगा काढलेला दिसत आहे. गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाकावरती टिच्चून सिंहस्थ कुंभमेळासह सर्वच विषयांची हाताळणी करत आहेत. सबंध प्रशासन त्यांच्या इशाऱ्यावर कार्यरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणावे तसे पालकमंत्री पदा वाचून कुठे काय अडले आहे? हे देखील खरेच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.