Nashik Politics : उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून हकालपट्टी केलेले नाशिक येथील वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना अखेर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. नाशिक पश्चिमच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिरे यांनीच बडगुजर यांचा पराभव केला होता. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्याचे मोठे धाडस दाखवले. मात्र बडगुजर यांचे एक कौशल्य आणि नाशिकवर आपलेच वर्चस्व राहावे, अशी आखणी मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना नाशिकची सर्व जबाबदारी बडगुजर पेलत असत. एखाद्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्याची, त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करण्याची बडगुजर यांची हातोटी आहे. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, असे नाशिक येथील जाणकार सांगतात. महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, याचे अधिकार संजय राऊत यांनी बडगुजर यांनाच दिले होते. महापालिकेचे विविध टेंडर कसे मिळवायचे, यातही बडगुजर यांची हातोटी आहे, असेही सांगितले जाते. भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना बडगुजर यांचे हेच कौशल्य आवडले, अशी चर्चा आहे.
बडगुजर यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक असताना गुत्तेदारी केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. महापालिकेच्या राजकारणात बडगुजर यांची पकड असल्याचे सांगितले जाते. आमदार सीमा हिरे यांच्यासाठी ही बाब अडचणीची ठरू शकते. बडगुजर हे आपल्या पत्नी, मुलाला महापालिकेची उमेदवारी देऊ शकतात. आमदार सीमा हिरे या आपल्या कन्येला महापालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. बडगुजर यांच्यामुळे यात अडथळा येईल का, असेही त्यांना वाटत असेल. देशद्रोह्यांसोबत पार्टी केली, नृत्य केले, यावर तर आमदार सीमा हिरे यांचा आक्षेप आहेत. देशद्रोह्यांसोबत काम करणे शक्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांनी अक्षरशः पायघड्या घातल्या. आमदार हिरे यांनी प्रचंड धाडस दाखवत याला विरोध केला. या दोघांच्या विरोधात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोधाची भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिरे यांनी बावनकुळे, महाजन यांची यासंदर्भात तक्रार केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हा विरोध हिरे यांनी पुढे जाऊन जड जाऊ शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. यापैकी एकालाही मोठे होऊ द्यायचे नाही, त्यांना सतत अस्थिर ठेवायचे, अशी खेळी महाजन यांची असते. भाजपच्या एकाही आमदाराला मोठे होऊ न देता नाशिकवर आपलेच वर्चस्व कसे राहील, याची काळजी महाजन घेतात, असे राजकीय जाणकारांना वाटते. महाजन यांची ही कार्यशैली बघता आमदार सीमा हिरे यांचेही राजकारण संकटात येऊ शकते. असे असतानाही त्यांनी धाडस दाखवले. बडगुजर विधानसभेच्या उमेदवारीवर दावा करू शकतात, बडगुजर यांच्या माध्यमातून महाजन नाशिकची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊ शकतात, ही चिंताही आमदार हिरे यांना सतावत असणार.
सलीम कुत्ता हा या देशाचा शत्रू दाऊदचा जवळचा साथीदार आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी करणे म्हणजे संवेदना मेल्या आहेत, असे म्हणावे लागेल.मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची ठराविक वेळेत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते. नितेश राणे यांनी या प्रकरणात बडगुजर यांच्यासह त्यांच्या गॉडफादरवर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. दादा भुसे, एकनाथ शिंदेही बडगुजर यांच्याविरोधात कडाडले होते, हे विशेष. या पार्श्वभूमीवर आमदार सीमा हिरे यांनी केलेला विरोध उठून दिसत आहे, त्याची राजकीय किमत त्यांना चुकवावी लागेल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.