Nagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर नगर न्यायालयातील वकिलांच्या बार रुममध्ये पक्षातील नगरमधील जुन्या महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी हातात चप्पल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हिंदू देवी - देवतांचा अपमान केला म्हणून हा विरोध असल्याचे सांगून सुषमा अंधारे यांना धडा शिकवणारच, असा इशारा अष्टेकर यांनी दिला. हा प्रकार आज दुपारी न्यायालयात झाला. या प्रकारामुळे न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी पदयात्रा सुरू आहे. या यात्रेचा 19वा दिवस असून ती नगरमध्ये दाखल झाली आहे. यानिमित्ताने अंधारे नगरमधील सर्वच क्षेत्रातील लोकांशी चर्चा करत आहेत. राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर अंधारे या नगरमधील वकिलांशी आज दुपारी संवाद साधणार होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर नगर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी देखील होते.
सुषमा अंधारे या नगर न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये वकिलांशी संवाद साधण्यासाठी तिथे पोहोचल्या. वकिलांच्या गाठीभेट घेत असतानाच, तिथे नगरमधील शिवसेनेच्या जुन्या महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर तिथे आल्या. हिंदू देवी - देवतांचा अपमान करणाऱ्यांचे इथे काय काम आहे ? असा सवाल त्यांनी केला.
यातून अंधारे आणि अष्टेकर यांचे समोरासमोर वाद झाले. वाद विकोपाला पोहोचत आहे, हे पाहून अंधारे यांच्याबरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीसाठी हस्तक्षेप केला. परंतु अष्टेकर या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. यातच त्यांना वकील महिला अनिता दीघे यांची साथ मिळाली. यानंतर गोंधळात भर पडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वाढता गोंधळ पाहून सुषमा अंधारे यांनी वकिलांच्या बार रूममधून निघाल्या. याचवेळी अष्टेकर यांनी पायातील चप्पल काढून अंधारे यांच्या अंगावर धावून गेल्या. यातून काहीशी झटापट झाली. यामुळे न्यायालयाच्या बार रूममध्ये गोंधळ उडाला. अंधारे यांच्याबरोबर यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. अष्टेकर आणि दीघे आक्रमक झाल्यानंतर महिला पोलिसांनी पुढे येत हस्तक्षेप केला. काही महिला पोलिसांनी अष्टेकर यांना तेथून बाजूला नेले, तोपर्यंत अंधारे या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.
यावेळी स्मिता अष्टेकर म्हणाल्या, ती गेली 30 वर्षे शिवसेना संघटनेचे काम करत आहे. शिवसेनेसाठी पाच वेळा तडीपार झाले आहे. अंधारे यांना कोणत्या कारणामुळे शिवसेनेत घेतले याचे आम्हाला देणे घेणे नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही कट्टर हिंदू आहोत. सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवतांचा वारंवार अपमान केला आहे. हे कदापि सहन करणार नाही. हे बाळासाहेबांनी देखील मान्य केले नसते.
सुषमा अंधारे यांच्याबरोबर फिरत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा देखील अष्टेकर यांनी निषेध केला. सुषमा अंधारे यांनी धडा शिकवणारच, असा इशारा देखील त्यांनी दिला. अनिता दीघे यांनी सुषमा अंधारे यांच्या न्यायालयातील संवाद दौऱ्यावर आक्षेप घेतला. न्यायालयात येण्यासाठी अंधारे यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेतली का, असे प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी पुन्हा न्यायालयात आल्यास धिंड काढू, असा इशारा दिला.
शिळ्या कढीला ऊत आणू नका...
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, "काही झालेले नाही. मातृतीर्थ ते शिवतीर्थ असे अभियान सुरू आहे. समाजातील सर्वच घटकांशी बोलत आहोत. माझा वकिलीशी संबंध आहे. राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येमुळे मी वकिलांशी संवाद साधायला आले होते. आम्ही तासभर चर्चा केली".
तेवढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून कोणता तरी पक्ष आहे. त्या पक्षाच्या बाई काहीतरी बोलत होत्या. त्या कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत. त्यांना राजकीय स्टंट करायचा असतो. मी येथे राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी म्हणून आलेले नाही. मी कायद्याशी निगडीत असलेल्यांशी संवाद साधायला आले होते. काही राजकीय पक्षाच्या लोकांना शिळ्या कढीला ऊत आणायचा असेल, तर मी त्यावर काही भाष्य करणार नाही, असे अंधारे यांनी यावेळी सांगितले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.