Nashik News : तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न महापालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरत आहे. शिवसेना आणि मनसेने त्याला प्रखर विरोध केला. आता भाजपचे अन्य सहकारी देखील त्याच सुरात बोलू लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात याच मुद्द्यावरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिवसेना शिंदे पक्षाची युती केली आहे. मात्र, काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या युतीची डोकेदुखी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही जागांवर वाद आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्यावर तोडगा काढण्यात येईल. काही उमेदवारांची माघार व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 39 तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने 109 जागावर उमेदवार दिले आहेत. दोन्ही पक्षांची युती असूनही प्रचारात राजकीय अडथळा निर्माण होत आहेत. निवडणूक पाच दिवसांवर आल्याने याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न आहेत.
यासंदर्भात माजी खासदार भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महापालिकेत सत्तेत नाही. मात्र तपोवनातील वृक्षतोडीला आमचा प्रखर विरोध राहील. कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड होऊ देणार नाही. महापालिका निवडणुकीचा निकाल आल्यानंतरही भूमिका ठाम राहील असे ते म्हणाले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधू ग्रामच्या जागेत 50 एकरवर झाडे आहेत. उर्वरित २०० एकर जागा मोकळी आहे. या दोनशे एकर जागेवर सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सुरू करायला हरकत नाही. मात्र, त्याबाबत प्रशासन आडमुठी भूमिका घेत आहे. साधू ग्रामच्या जागेत कायमस्वरूपी औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रदर्शन केंद्र देखील होता कामा नये. शहरात अनेक ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. त्या पर्यायांचा विचार महापालिकेने केला पाहिजे.
गेल्या पाच वर्षात नाशिक शहरात मोठ्या प्रकल्प आणण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले नाही. याबाबत भाजप ठोस उपक्रम आणि प्रकल्प आणू शकलेली नाही. डोळ्यात भरेल असा एकही प्रकल्प आला नाही. त्या संदर्भात त्यांना यश आले नाही, अशी टीका खासदार भुजबळ यांनी भाजपवर केली.
महापालिका निवडणुकीत भाजपपेक्षा शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे चित्र दिसेल. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. निवडणुकीच्या निकालातून हे परिश्रम दिसून येतील, असा दावा माजी खासदार भुजबळ यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.