Uddhav Thackeray  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उसळली गर्दी; भगुरकरांचे रेड कार्पेट!

Roshan More

Nashik : अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू असतानाच नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला नागरिक उपस्थित नसतील, असा टोला भाजप नेते लगावत होते. मात्र, ठाकरेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे अधिवेशन नाशिकमध्ये आहे. ओझर विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसेना (ShivSena) पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. ओझरपासून नाशिक शहरापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले होते. ठाकरे विमानतळावरून थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी भगुर येथे गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे यांच्यासाठी भगुरच्या नागरिकांनी शिवाजी चौक ते सावरकर स्मारक या मार्गावर रेड कार्पेट अंथरले होते. भगुर येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजीमहाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला त्यांनी हार घालून उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले. ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. इमारतींच्या गच्चीवरदेखील नागरिकांची गर्दी होती. त्यांनी हात हलवून आणि जय महाराष्ट्र म्हणत ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांच्यासमवेत 100 हून अधिक वाहने होती. ठाकरेंच्या ताफ्यामुळे शहरात मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीदेखील झाली होती.

उद्धव ठाकरे जवळपास अर्धा तास सावकर स्मारकात होते. 'आज मी एकदा प्रखर हिंदूत्ववादी नेत्याच्या जन्मस्थळी भेट दिल्याने समाधानी आहे. सावरकर हे नेहमीच हिंदूत्व आणि सामान्य नागरिकांसह देशप्रेम म्हणून ख्याती असलेले आहेत. त्यामुळे नाशिकचा दौरा त्यांच्या स्मारकापासून सुरू केला आहे,' असे त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांच्यासमवेत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते होते.

ठाकरेंच्या स्वागतासाठी भगुरचे नगराध्यक्ष व जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अनिता करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, माजी मंत्री बबन घोलप आदींसह विविध नेते उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT