Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News: ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे हात दाखवून अवलक्षण?

Sampat Devgire

Jailgaon Politics News: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोरा (जळगाव) येथे सभा घेतली. सभेला मोठी गर्दी होती. कोणताही कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची असते. मात्र गुलाबराव पाटील यांनी या सभेत घुसण्याची घोषणा करून नवी चर्चा अन् हात दाखवून अवलक्षण असे राजकारण केल्याचे चित्र पहायला मिळाले. जळगाव जिल्हा व जनतेचे अन्य प्रश्न संपले की काय? असा प्रश्न त्यातून निर्माण झाला. (Is jalgaon`s all important issues over)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकत्व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडे आहे. याशिवाय जळगावमध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महत्त्वाचे नेते आहेत. मात्र हे नेते सदैव राजकारणव आरोप, प्रत्यारोपच करतांना दिसतात. जनतेच्या प्रश्नावर सहमतीचे राजकारण त्यात नसते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेच्या निमित्ताने गुलाबराव पाटील यांनी तर कळसच केला, असे म्हणता येईल.

जळगाव जिल्ह्याचे विकासाचे, परिसराच्या प्रगतीचे व जनहिताचे प्रश्‍न संपलेले नाहीत. उलटपक्षी, ते वाढतच आहेत. मात्र प्रगल्भ राजकारणाचा पत्ताच नसलेले सर्वच पक्षातील नेते परस्परांवर राजकीय चिखलफेक करण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाहीत. त्यांचे राजकारण म्हणजे कदाचीत विस्तीर्ण वाळवंटात पाण्याचा झरा मिळेलही... पण, जळगावच्या विकासाच्या विषयावर दोन नेते एकत्र येऊन बोलताहेत, असे चित्र दिसणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याच्या निमित्ताने अशा बेताल वक्तव्यांच्या उडालेल्या धुराळ्याने ‘विकासावर बोलूच नाही...’ या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले.

अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा पत्ता नाही. जळगाव शहराच्या विकासात गेल्या काही वर्षांत एक वीटही रचली गेलेली नाही. रस्त्यांची कामे कशीबशी सुरू आहेत. नव्या रस्त्यांवर सर्रास जेसीबी फिरवला जातोय. सिंचन प्रकल्पांच्या कामांना निधी नाही आणि गतीही नाही. जळगावसाठी ना एखादी नवी योजना ना रोजगार देणारा उद्योग... अशा रखडलेल्या कामांची यादी खूप मोठी आहे. यावर नेते कधीच का बोलत नाहीत हा जनतेच्या मनातील प्रश्‍न आहे. जनतेच्या मनातील या प्रश्नावर कुणाकडेच समाधान नाही का. आणि असेल तरी ते द्यायचे नाही, अशी सार्वत्रिक अवस्था?.

गेल्या वर्षभरात राज्यातील सत्तांतर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांचा कोन नव्वद नव्हे, तर थेट ३६० अंशांतून वळला. शिवसेनेतच उभी-आडवी फूट पडल्याने त्याचे पडसाद अगदी गावपातळीपर्यंत उमटले. एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे १०० टक्के सहभाग दिसला. अगदी जन्मजात शिवसैनिक म्हणवून घेणारे नेते, कार्यकर्तेही शिंदे गटात गेले.

शिवसेनेतील या उलथापालथीनंतर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा त्याच चिखलफेकीच्या नव्या मालिकेची सुरवात झाली आहे. रविवारी ठाकरे येण्याच्या दोन दिवस आधीच संजय राऊत जळगावात दाखल झाले. ‘राऊत अन्‌ सनसनाटी वक्तव्यं’ हे समीकरण शुक्रवारी रात्रीपासून जळगावातही सुरू झालं. राऊत काही ना काही बोलून साऱ्यांनाच अंगावर घेतात. शिवसेनेतच शाखाप्रमुख ते मंत्री झालेल्या गुलाबराव पाटलांची शैलीही अशीच आहे.

खासदार राऊत अन्‌ गुलाबराव संघर्ष रंगणार, हे नक्की होतं. झालंही तसंच. ‘राऊतांनी चौकटीत बोलायचं, नाहीतर.. सभेत घुसणार’, असा गुलाबरावांनी दम भरला आणि राऊतांना आयतं कोलीत मिळालं. त्यांनी लागलीच चौकट मोडली. हा वाद आता त्या पुढं गेला. सभेत राडा, काळ्या फिती व झेंडे... गुलाबगँग वगारे...वगैरे...

सभेच्या निमित्ताने पोलिसांचा बंदोबस्त तर होताच, पण दोन्ही गटांकडील वाचाळवीरांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून उगाचच वातावरण ‘टाइट’ केलं. ईद, परशुराम जयंती, आखाजीच्या बंदोबस्तातील तणावात पोलिसांवर या नेत्यांच्या वक्तव्यांनी ताण वाढला. मंत्री असूनही गुलाबराव पाटील वा त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी काय केलं?, हा जाब खरेतर राऊत यांनी विचारायला हवा होता. त्याला उत्तर देण्यासाठी गुलाबरावांजवळ काहीतरी ठोस मुद्दे असायला हवे होते. मात्र, विकास व जनहिताच्या मुद्यांवर बोलायचे नाही. गाव-गल्लीतील पाण्याच्या नळावर महिलांचे वाद होतात तसे भांडत राहायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचा हा दौरा पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि पाचोऱ्यात स्व. आर. ओ. तात्यांच्या पुतळा अनावरण या दोन चांगल्या कारणांसाठी होतोय. या चांगल्या निमित्ताला अशा गलिच्छ राजकारणाचे गालबोट लागायलाच नको होतं. अर्थात, त्यासाठी दोन्ही गटांकडील नेत्यांनी संयम, तेवढी प्रगल्भता बाळगायल हवी. पण, या वादाशिवाय यांच्या दौऱ्याला आणि त्यांच्या राजकारणाला ‘टीआरपी’ मिळणार नाही, म्हणून कुणी शिव्या घातल्या तरी आम्ही असेच राजकारण करीत राहू, विकासावर मात्र बोलणार नाही, अशीसाऱ्यांचीच भूमिका असेल तर ते जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT