Vasant More, Avinash Jadhav Sarkarnama
महाराष्ट्र

Vasant More Resign MNS : वसंत मोरेंची 'मनसे'ला सोडचिठ्ठी अन् अविनाश जाधवांची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत!

Mayur Ratnaparkhe

MNS Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मागील 18 वर्षांपासून ते राज ठाकरेंना आपले नेते मानून मनसेमध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांनी आता पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला. या वेळी त्यांनी पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीवर आरोप केले आहेत. शिवाय राज ठाकरेंचीही आपल्यावरील माया आटली असल्याचे सांगत, त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

वसंत मोरेसारख्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी आणि कुरघोडीला कंटाळून पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यापुढील काळात कुणीही आणि कितीही मनधरणी केली तरी पुन्हा मनसेमध्ये जाणार नाही, असे वसंत मोरे((Vasant More) ) यांनी स्पष्ट केले. तर एकीकडे वसंत मोरे यांच्या राजीनामाची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसेचे नेते अविनाश जाधव यांची फेसबुक पोस्टही चांगलीच व्हायरल झाल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अविनाश जाधव(Avinash Jadhav) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धूमधडाक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे.'

सोशल मीडियावरील यूजर्स अविनाश जाधवांच्या या पोस्टचा वसंत मोरेंशी संबंध जोडत आहेत. मात्र, खरोखर ही पोस्ट वसंत मोरेंसाठीच होती का? हासुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.

मनसेचे(MNS)  पुणे शहराचे फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेने राम राम केल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले वसंत मोरे यांनीदेखील शिवसेनेचा राजीनामा देत राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या मागे जाणे पसंत केले. मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिला फळीतील ते पदाधिकारी होते. महानगरपालिकेत तीन टर्म ते मनसेचे नगरसेवक होते. या दरम्यान महापालिकेतील मनसेचे गटनेते, विरोधी पक्षनेते, पुणे शहराचे अध्यक्ष, मनसेचे सरचिटणीस अशा विविध पदांवर मोरे यांनी काम केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT