Amit Shah with BJP officials sarkarnama
विदर्भ

Amit Shah Akola Visit : धीरगंभीर दिसणाऱ्या शाहांनी अख्ख्या सभागृहाला खळखळून हसवले अन॒ रडवलेही...

प्रसन्न जकाते

Amit Shah Akola Visit : टीव्हीवर आणि संसदेच्या बाकांवरून विरोधकांवर हल्ला करताना नेहमीच धीरगंभीर दिसणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगळेवेगळे रूप विदर्भातील भाजपच्या खासदार, आमदारांना बघायला मिळाले. मंगळवारी (ता. पाच) अमित शाह यांनी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यावेळी रिधोरा मार्गावर असलेल्या हॉटेल जलसाच्या हॉलमध्ये कानात प्राण आणून ऐकणाऱ्या नेत्यांना मोदींच्या या ‘चाणक्य’ने खळखळून हसवले आणि रडवलेही. त्यामुळे एकाच नेत्याची दोन वेगवेगळी रूपे भाजपच्या नेत्यांना बघायला मिळाली.

अकोला दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपच्या नेत्यांना ‘दशसूत्री’ कानमंत्र दिला. पक्षातील नेत्यांना निव्वळ झापझूप करण्यापेक्षा त्यांना योग्य तो संदेश कसा द्यायचा याच्या उत्कृष्ट वक्तृत्वशैलीचा परिचय मोदींच्या चाणक्यने सर्वांना दिला. नेतेगिरी अंगात आणणऱ्यांना त्यांनी सज्जड दमही भरला. आपल्या दहा कानमंत्रात्र शाह म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमी सकारात्मक राहावे. भाजपमध्ये आता अनेक लोक येत आहेत.

एखादा व्यक्ती पक्षात आला म्हणून पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला हुसकावून लावले जाणार नाही. भाजपसाठी नेता व कार्यकर्ता महत्त्वाचा आहेच, पण राष्ट्र सर्वतोपरी आहे, हा दुसरा मंत्र त्यांनी दिला. तिसरा मंत्र देताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, गावाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या कामाचा ‘रिपोर्ट’ घेतला जात आहे. त्यामुळे पक्षासाठी जो काम करेल, त्याची दखल नक्कीच घेतली जाईल.

जो पक्षाच्या विरोधात जाऊन काम करेल त्याचे काय होईल, याचा संदेशही त्यांनी स्पष्टपणे न बोलता देऊन टाकला. पाचवा मंत्र देताना त्यांनी नेत्यांना कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला दिला. पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठा होत असतो. त्यामुळे उगाच नेतागिरी अंगात आणू नका. जास्त नेतागिरी आणली तर काय होते, असा इशारा देत त्यांनी मुजोरी करणाऱ्या नेत्यांसाठी सहावा मंत्रवजा इशारा देऊन टाकला.

भाजपसाठी व्यक्ती, कुटुंब आणि परिवारवाद यापेक्षा राष्ट्र आणि ध्येयधोरणे महत्त्वाची असल्याचा सातवा मंत्र त्यांनी दिला. याचा दाखला देताना ते म्हणाले की, शाह नव्हते तेव्हाही पक्ष होता. शाह आहे तेव्हाही पक्ष आहे. शाह नसले तरी पक्ष असेल. नेत्यांसह सर्वांनाच त्यांनी जनतेप्रती संवेदनशील राहण्याचा आठवा मंत्र शाह देण्यास विसरले नाही. दुसऱ्याची रेष खोडण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी करता येईल, याचा नववा मंत्र शाह आपल्या भाषणातून देऊन गेले.

दहावा मंत्र मोलाचा

दशसूत्रीतील दहावा मंत्र देताना शाह यांनी सत्तेचे महत्त्व सर्वांना विशद केले. हाती सत्ता असेल तर आणि बहुमत असेल, तर काय नाही करता येत याची अनेक उदाहरणे त्यांनी आपल्या संबोधनात दिली. कलम 370, तीन तलाक, अयोध्येतील राम मंदिर, पाकिस्तानवर करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राइक, कोविड महासाथीवर मात करताना घेतलेला निर्णय, जगाच्या पाठीवर सुरू असलेल्या युद्धांमध्ये भारताची भूमिका, अशी वेगवेगळी उदाहरणे त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधी हसू मग रडू

अमित शाह यांनी अगदीच ‘लेक्चर’ देण्यापेक्षा किंवा ज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा अत्यंत ‘लाइटली’ संवाद साधला. सभागृहात अनेक उदाहरणे व किस्से सांगताना त्यांना सर्वांना खळखळून हसवले. लोकसंघ स्थापन झाल्यापासून आज बहुमतात असलेल्या भाजपच्या प्रवासाचे त्यांनी वर्णन केले. या वेळी त्यांनी जे दाखले दिले, ज्या प्रसंगांचे वर्णन केले, आणीबाणीचा काळ सांगितला ते ऐकताना अनेकांना गहीवरून आले. त्यामुळे क्षणात हसविणारे व क्षणात भावनिक साद घालणाऱ्या अमित शाहांचे दर्शनही उपस्थितांना झाले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT