विदर्भ

Lok Sabha Election 2024 : दीडशे मिनिटांत शाह घेणार साडेपाचशे जणांचा आढावा

Amit Shah At Akola : विमानतळ ते हॉटेलपर्यंत शेकडो कार्यकर्ते स्वागतही स्वीकारणार. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आवरते घेण्याचा अकोला भाजपकडून सल्ला

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचा अकोला दौरा मंगळवारी (ता. पाच) होणार आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी अमित शाह यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. अमित शाह यांच्या दीडशे मिनिटांच्या या दौऱ्यात स्वागतासह भाजपच्या तब्बल 600 जणांना भेटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पाच लोकसभा मतदारसंघांचा आढावा अमित शाह घेणार आहेत. या पाच मतदारसंघांतील भाजप उमेदवारांची चाचपणीदेखील शाह करणार आहेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातील भाजप पदाधिकारी अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी कामाला लागले आहेत.

काही दिवसांनंतर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केंद्रीय नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. भाजपकडूनही जोरदार तयारी या निवडणुकीची करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचा पश्चिम विदर्भातील दौरा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला असताना त्यांच्यानंतर आता अमित शाह यांचा पश्चिम विदर्भाचा दौरा होत आहे. शाह आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारी (ता. पाच) शाह हे अकोला येथे येणार आहेत. या दौऱ्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता अमित शाह यांचे अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील संचलन समिती, विविध सात आघाड्यांचे पदाधिकारी अशा एकूण निवडक साडेपाचशे जणांची बैठक हॉटेल जलसा येथे घेण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. दीड वाजेपर्यंत अमित शाह या बैठकीत विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेतील.

शाह 120 मिनिटांत करणार काय?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह यांचा अकोला दौरा आगमनापासून बाहेर पडेपर्यंत 120 मिनिटे चालणार आहे. बैठकीत भाजपच्या बड्या नेत्यांसह, खासदार, आमदार आणि निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तब्बल साडेपाचशे जणांना शाह हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. याच 120 मिनिटांत ते विदर्भातील संभाव्य उमेदवारांचे समर्थक व विरोधक दोघांचेही म्हणणे ऐकून घेणार आहेत. शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे निवडक लोकच अपेक्षित आहेत. शाह यांच्या बैठकीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे पोलिस सुरक्षा पास तयार झाले आहेत. त्यामुळे ऐनवेळी कोणीही बैठकीत कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

पहिल्या यादीनंतरही बैठक

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. लवकरच महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. विदर्भातील उमेदवार ठरविण्यासाठीच शाह यांचा दौरा महत्त्वाचा आहे. अकोला येथे कमीत कमी वेळेत शाह यांना महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना दीड तासात पाच ते सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करायची आहे. याच बैठकीत उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करायची आहेत.

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या सहा मतदारसंघांतील अमरावतीसाठी महायुतीकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी कोर्टाच्या निर्णयावर राणा यांचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय आता राणांना महायुतीमधील सर्वच पक्षांकडून लेखी विरोध होत आहे. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार शोधण्यासाठी भाजपचा मोठा कस लागणार आहे.

अकोला मतदारसंघासाठी इच्छुकांतून उमेदवार निवडणार की, दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवार ‘इम्पोर्ट’ करणार हे शाह ठरविणार आहेत. बुलढाणा मतदारसंघावर भाजपचे लक्ष आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. या मतदारसंघावर भाजपचा यंदा दावा आहे. त्याबाबतही शाह यांच्या निर्णय घेणार आहेत. बुलढाण्याचा आढावा महत्त्वाचा मानला जात आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात भावना गवळी यांच्या नावालाही तगडा विरोध आहे. एकूण 120 मिनिटांच्या बैठकीत भाजपचे ‘चाणक्य’ मानले जाणारे अमित शाह यांना समर्थक-विरोधकांचे म्हणणे ऐकून घेत समतोल निर्णय द्यावा लागणार आहे.

वाहनातूनच अभिवादन

अकोल्यातील शिवणी विमानतळ ते बैठक आयोजित करण्यात आलेल्या बाळापूर रोडवरील हॉटेल जलसापर्यंत अमित शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. या मार्गावरील आठ ठिकाणी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून शाह यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. जनतेशी संवाद तसेच रोड शो करण्याच्या दृष्टीने भाजपचे नियोजन आहे. शहरातील विविध पदाधिकाऱ्यांना अमित शाह यांना भेटणाऱ्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. मात्र, आठ ठिकाणी शाह वाहनातूच स्वागत स्वीकारणार आहेत. त्यासाठी अवघे काही सेकंद नेत्यांना मिळण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्यासोबत दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सरचिटणीस सुनील बंसल, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, अमरावतीचे खासदार अनिल बोंडे तसेच विदर्भातील 20 आमदार राहणार आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT