Akola District Political News : रावणाच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या व्यक्ती आणि मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश भंडारा येथील जिल्हादंडाधिकारी यांनी बजावल्यानंतर आता हाच विषय घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी रावण दहनाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यासाठी पुढे आले आहे. (Ravana is worshiped by some tribal communities in India)
अकोला येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रावणाचे पुतळे जाळणे यामागे धार्मिक तेढ निर्माण करणे हा उद्देश असल्याचेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मिटकरींच्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील काही आदिवासी समुदाय रावणाची पूजा करतात. अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात रावणाची पूजा केली जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भंडारा जिल्ह्यातील काही आदिवासी संघटनांनी रावण दहन करण्याला विरोध दर्शवून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रावण दहन करण्यावरून विरोध होत असताना भंडारा येथील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी लीना फालके यांनी आदेश बजावत रावणाच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळांवर गुन्हे दाखल करावे, असा आदेश बजावला आहे.
सध्या हे पत्र समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. आणि अनेकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिल्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांची चूक लक्षात येताच, त्यांनी सुधारित पत्र काढलं आहे. मात्र, या पत्रात कुठलाही आदेश नसल्याने आता संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. तर अखिल भारतीय आदिवासी परिषद, ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.
रावण दहनाला आदिवासी बांधवांचा विरोध होत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यात उडी घेत रावण दहनाच्या प्रथेला जोरदार विरोध केला आहे आणि हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचंही मिटकरींनी म्हटलं आहे.
रावण हे जर आदिवासी बांधवांचे दैवत असेल तर रावण दहन कशाकरिता, याचं उत्तर मला अपेक्षित आहे. म्हणून मी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आदिवासींच्या मनातील भावना मी मांडणार आहे. रावण दहन करून अपमान करण्यामागची भावना काय कारण एखाद्या नेत्यांचा पुतळा जाळला तर गुन्हे दाखल होतात. हा तर लंकेचा राजा होता. त्यामुळे लंकेचा राजाचा शिवभक्ताचा पुतळा जाळणे या मागचा उद्देश हा धार्मिक तेढ निर्माण करणे असा असतो.
शेवटी रामही वंदनीय आहेत आणि रावणही असंही आमदार मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जो कोणी रावण दहन करेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणीही आमदार मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांच्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आदिवासी समाजाचा रावणदहनाला विरोध का?
देशातील काही आदिवासी समाजाकडून रावणाला दैवत मानलं जातं. अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. रावण हा मोठा शिवभक्त होता. या शिवाय रावणामध्ये अनेक चांगले गुण होते. एका राजामध्ये जे गुण आवश्यक असतात, ते सर्व गुण रावणामध्ये होते. तरीही त्याला नेहमी खलनायक म्हणून पाहिले जाते. त्याच्यासारखा पराक्रमी राजा नव्हता. त्यामुळे त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला अपमानित करणे चुकीचे आहे, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे.
हिंदू धर्मात म्हणून करतात रावणाचे दहन...
सध्या शारदीय नवरात्री उत्सव सुरू आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. त्यानंतर दशमीला रावण दहनाची परंपरा आहे. ही परंपरा देशभरात पाळली जाते. रावण दहनाला दसरा म्हणतात आणि हा सण वाइटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. भगवान राम आणि रावण यांच्यातील धर्म आणि अधर्माच्या युद्धात धर्म म्हणजेच भगवान राम जिंकले आणि रावणाचा मृत्यू झाला. तेव्हापासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.