MP Ramdas Tadas  Sarkarnama
विदर्भ

Amravati BJP Politics: अमरावती भाजपत अंतर्गत कलह वाढला; खासदार तडस यांच्यावर पक्षातील पदाधिकारीच नाराज ?

Ganesh Thombare

Amravati News: विकासकामे होत नसल्याने अमरावतीतील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. असे असतानाही आपल्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यातील विकासाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या नेत्याला पक्षाने पुन्हा संधी दिल्यास त्यांचा प्रचार करायचा की नाही, अशा विचारात सध्या अमरावती जिल्ह्यातील भाजप आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड हा भाग वर्धा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून भाजपचे खासदार रामदास तडस हे प्रतिनिधित्व करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तडस यांच्याबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी आहे. मोर्शी-वरुड या परिसरात या मुद्द्यावरून धुसफूस सुरू आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघावर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड परिसराची छाप नेहमीच राहिली. या भागातील भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे तडस यांचा विजय झाला. पण आता तडस यांनाच त्यांच्या स्वपक्षीयांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे, असे असतानाही मोर्शी-वरुड परिसराच्या विकासाकडे खासदार तडस यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कोणताही ठोस विकास या भागात न झाल्याने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमधील खदखद वाढत आहे.

भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी खासदार तडस यांच्यावर दुर्लक्षासंदर्भात थेट टीका करीत कार्यकर्ते दुरावत असल्याचे नमूद केले. खासदार तडस यांच्या विरोधात आता भाजपधील युवा पदाधिकारी व कार्यकर्तेच बोलू लागल्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना अडचणीचा सामना करण्याची शक्यता आहे.

नऊ वर्षांपासून या भागात भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले होते; पण विजय मिळाल्यानंतर खासदार तडस मोर्शी-वरुड भागापासून दुरावत गेले.

सद्य:स्थितीत त्यांचा या दोन्ही भागातील कार्यकर्त्यांशी संवाद अत्यंत कमी झाला असल्याचे भाजपचेच सदस्य सांगतात. एकही मोठा प्रकल्प, विकासाची एकही मोठी योजना या भागात राबविण्यात आलेली नाही. २०१९ मध्ये विधानसभेची जागा गमाविल्यापासून येथील भाजपमध्ये खदखद वाढली आहे.

भाजपच्या नेत्यांनी केवळ तडस यांच्याप्रती नाराजीच व्यक्त केली आहे असे नाही. त्यांनी अनेक गंभीर आरोपही त्यांच्यावर केले आहेत. खासदार तडस यांच्या विकास निधीतील कामे मिळत नसल्याचा आरोप श्रीराव यांनी केला.

निष्ठावान कार्यकर्त्यांना वगळत अन्य पक्षाच्या लोकांना निधी मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. श्रीराव यांची खासदार तडस यांच्याबाबत असलेली नाराजी खरोखर संपूर्ण भाजपची आहे की, त्यांचे काही व्यक्तिगत हेवेदावे खासदार तडस यांच्यासोबत आहे, याची चाचपणी आता भाजप पक्षश्रेष्ठी करत आहेत.

खासदार तडस यांच्या समर्थकांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांच्या विकासाबाबत खासदार तडस यांचे योग्य लक्ष असल्याचे तडस समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही जिल्ह्यांचा संतुलित विकास करण्याचे काम ते करत आहेत.

त्यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही भागाला त्यांनी डावलले नाही. भाजपच्याच काय परंतु सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा त्यांनी योग्य तो सन्मानच केला आहे, असे त्यांच्या समर्थकांनी नमूद केले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT