Amravati News : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यात पक्षीय नेत्यांना आलेले अपयश आणि शिक्षक संघटनांच्या उमेदवारांनी लावलेली शक्ती, यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. गेल्या सव्वाचार दशकांच्या इतिहासात या मतदारसंघातून शिक्षकांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारास संधी दिली नाही. यावेळी मात्र राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.
23 ऑक्टोबरला मतदान होणार असून, रिंगणातील 26 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या भाजपच्या तीन व सेनेच्या एका उमेदवाराने अखेरच्या क्षणापर्यंत माघार घेतलेली नाही. यामुळे महायुतीच्या उमेदवाराची कोंडी झाली असतानाच महाविकास आघाडीतही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी शिक्षक संघटनांनी देखील ताकदीने मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे.
शिवसेना (Shivsena) उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे, हे एकीकडे झुंज देत आहेत. तर दुसरीकडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजुक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचीही उमेदवारी चर्चेत आली आहे.
उबाठाचे दत्तात्रय लहाने, बुलडाण्याचे सुरेश देवकर मैदानात कायम आहेत. ‘नुटा’ या संघटनेने काँग्रेसच्या उमेदवारासह चार शिक्षक उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या विवेकानुसार या उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा, असे ‘नुटा’ने म्हटले आहे. ‘नुटा’ने प्रा. प्रशांत विघे, अदिती पोहरे, दिलीप कडू आणि डॉ. अविनाश बोर्डे, या चार उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराशिप तसेच मेस्टाने संगीता शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षक संघटनांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरणार आहे.
रिंगणातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर शिक्षक संघटनांच्या उमेदवारांचे आव्हान आहे. त्याचवेळी शिक्षक संघटना एकसंघ नसल्याने व पक्षीय उमेदवारांसमोर त्यांच्याच पक्षातून संघटनांच्या पाठबळावर मिळालेले आव्हान, यामुळे मतविभाजनाचे संकट वाढले आहे. पसंतीक्रमाने मतदान होणार असले तरी पहिल्या व दुसऱ्या पसंतीच्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबले आहे. ट्रान्सफर मतांसाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करू लागले आहेत.
राजकीय पक्षाला संधी नाही
अमरावती शिक्षक मतदारसंघाचे सव्वाचार दशकाच्या इतिहासात १८ वर्षे विमाशि, १२ वर्षे शिक्षक परिषद व १२ वर्षे अपक्षांनी प्रतिनिधित्व केले आहे. वर्ष २०१४ नंतर या मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रवेश करीत मतदारसंघ मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या कुणालाही अद्यापपर्यंत शिक्षकांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली नाही.
शिक्षक संघटनांचा प्रवास
शिक्षक मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास ८० च्या दशकापूर्वी अमरावती आणि नागपूर एकत्रित शिक्षक मतदारसंघ होता. १९८३-८४ मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे बाबासाहेब सोमवंशी यांना संधी मिळाली. त्यानंतर १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत म. रा. शिक्षक परिषदेचे वसंतराव मालधुरे निवडून आले.
१९९६ मध्ये शिक्षक परिषदेने जागा कायम राखली. दिवाकर पांडे यांनी विजय मिळवला. २००२ मध्ये विमाशिचे वसंतराव खोटरे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकत पुन्हा एकदा संघटनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर २००८ मध्ये पुन्हा एकदा वसंतराव खोटरे यांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा इतिहास घडवला. २०१४ च्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव, मतांची फाटाफूट झाल्याने वसंतराव खोटरे यांचा पराभव करून अपक्ष श्रीकांत देशपांडे यांना शिक्षकांची आमदारकी मिळली. २०२० च्या निवडणुकीत श्रीकांत देशपांडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.