Rajendra Gavai Sarkarnama
विदर्भ

Another Party Leave MVA: आणखी एक पक्ष महाआघाडीची साथ सोडणार; शब्द न पाळल्याचा आरोप करत युतीसोबत जाण्याचे संकेत

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Political News: महायुतीकडून अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर आली किंवा राज्यसभेसाठी शब्द दिला तर त्यांच्यासोबत जाण्यासाठी विचार करायला काही हरकत नाही, असे सांगून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी महायुतीसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणखी एक नाराज पक्ष साथ सोडण्याच्या वाटेवर आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Another party upset with Mahavikas Aghadi : Gavai group ready to leave)

डॉ. गवई म्हणाले की, महाविकास आघाडीवर आम्ही नाराज आहोत. आम्ही काँग्रेससोबत वर्षानुवर्षे राहिलो आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत गवई गट महाविकास आघाडीसोबत भक्कमपणे उभा होता. पण, आता काँग्रेसने अमरावतीत आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. मला त्यांचा संदेश आला आहे की, आम्ही तुम्हाला लोकसभेला तिकिट देऊ; पण तुम्हाला काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षाच्या चिन्हावर लढावं लागेल.

काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत, बाबासाहेबांचं संविधन पाहिजे. पण, बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष त्यांना नको आहे. महाविकास आघाडी घटकपक्षांमुळेच कमकुवत होत आहे. रिपब्लिकन पक्षाला त्यांनी कमकुवत केलं, तर ते स्वतःही कमजोर होतील, असा इशारा डॉ. राजेंद्र गवई यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला निवडणूक न लढविण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवार आहे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या. पण, त्यानंतर जो शब्द पाळायला पाहिजे होता, तो शब्द पाळला नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोतच; पण नाराज आहोत, असेही गवई यांनी स्पष्ट केले.

गवई म्हणाले की, अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आमचा विचार आहे. एक तर स्वबळावर लढू. नाही तर आमचे संबंध आहेत. आज काय मी महायुतीकडे वळलो नाही. पण आमचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यक्तिगत आणि पारिवारीक संबंध आहेत. राजकारणात काहीही होऊ शकतं. काय होईल ते बघू. ‘वेट आणि वॉच’ची भूमिका ठेवा.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज संभ्रम निर्माण झालेला आहे. राजकीय मतभेद झाल्यानंतर पारिवारीक संबंध तुटतात. त्यामुळे माझ्या एकट्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम शरद पवार यांनी दूर करावा, अशी आमची इच्छा आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

आज महाराष्ट्रात स्वाभिमानाने स्वबळावर लढणारे दोनच पक्ष आहेत. एक पक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा, तर दुसरा रिपब्लिकन पक्ष (गवई गट) आहे. माझ्यापेक्षा आंबेडकरांची ताकद निश्चित जास्त आहे. आम्ही ज्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणचे पारडं निश्चितच जड होणार आहे. आज पन्नास-पन्नास टक्के वातावरण दिसत आहे, असा दावाही राजेंद्र गवई यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT